दोन वर्षांनंतरही न्याय नाही! महादेव मुंडे खून प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंचा मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:07 IST2025-10-04T19:06:10+5:302025-10-04T19:07:50+5:30
महादेव मुंडे खून प्रकरणास दोन वर्ष होत आले तरी अद्याप आरोपी निष्पन्न नाहीत; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तपासाला गती द्यावी, ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी

दोन वर्षांनंतरही न्याय नाही! महादेव मुंडे खून प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंचा मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
परळी : येथील प्रिया नगर परिसरातील बँकेचे पिग्मी एजंट महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण होत आली तरीही आरोपी अद्याप निष्पन्न झालेले नाहीत. या प्रकरणातील तपास ठप्प झाल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करून तपासाला गती द्यावी, अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे.
21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी येथील तहसील कार्यालयाजवळील पटांगणात महादेव मुंडे यांची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेला दोन वर्षांचा कालावधी होत आला आहे. या मध्ये पोलिसांनी कोणत्याही आरोपीला अटक केलेली नाही. या निष्क्रियतेबद्दल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तपासाला गती द्यावी, अशी मागणी केली होती, असे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत व्हावा म्हणून मुंडे यांच्या कुटुंबीयांनी 30 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. मात्र,त्यांच्या तपासास दोन महिने उलटूनही आरोपी निष्पन्न झाले नाहीत व त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. पंकज कुमावत यांच्यावर आपला विश्वास आहे असे ही त्यांनी सांगितले.
तपासात लक्षणीय प्रगती नाही
दरम्यान, 25 जुलै 2025 रोजी कनेरवाडी येथे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या माहेर आणि सासरच्या नातेवाइकांनी एसआयटी स्थापन व तपासाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. तसेच जुलै महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी परळीत येऊन मुंडे कुटुंब याची भेट घेतली होती . महादेव मुंडे खून प्रकरणात नेमकं दडलय काय हे मुख्यमंत्र्यांनी जगासमोर आणावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. अद्याप तपासात कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचाही माझ्याशी संपर्क असतो असे त्या म्हणाले