ऊस वाहतूक ट्रक, ट्रॅक्टरच्या कर्कश साउंड आणि बेभान वेगावर नियंत्रण नाही; नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी धाब्यावर, अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:26 IST2020-12-26T04:26:35+5:302020-12-26T04:26:35+5:30
माजलगाव तालुका हा उसाचा बेल्ट म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात १५ हजार हेक्टर ऊस उपलब्ध असून, या ...

ऊस वाहतूक ट्रक, ट्रॅक्टरच्या कर्कश साउंड आणि बेभान वेगावर नियंत्रण नाही; नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी धाब्यावर, अपघाताला निमंत्रण
माजलगाव तालुका हा उसाचा बेल्ट म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात १५ हजार हेक्टर ऊस उपलब्ध असून, या भागात दोन सहकारी व एक खाजगी साखर कारखाना आहे. मागील काही वर्षांत या भागातील ऊस गाळपास नेण्याची जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा दिसून येते. परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीनंतर यंदा ऊस गाळप हंगाम जोरात सुरू झाला आहे. तालुक्यातील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना व जयमहेश शुगर्स हे खाजगी कारखाने सुरू झाले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील जवळपास १०-१२ कारखान्यांच्या वतीने या भागातील ऊस गाळप होत आहे.
सर्वच कारखान्यांची तगडी तोड यंत्रणा उसाच्या फडात उभी आहे. त्याचबरोबर वाहतूक यंत्रणा रस्त्यावर धावत आहे. स्थानिक कारखाना कार्यक्षेत्रात काही प्रमाणात बैलगाडी व ट्रॅक्टरद्वारे उसाची वाहतूक केली जाते. मात्र, दूर पल्ल्याच्या ट्रक आणि ट्रॅक्टरमधून वाहतूक होते, ज्या भागात रस्ते खराब आहेत, अशा भागात तर ट्रॅक्टरमधूनच वाहतूक होत आहे. ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेचा अधिकांश भार उचलणाऱ्या ट्रॅक्टरचालकाकडून मात्र इतरांच्या सुरक्षिततेची काळजी ‘धाब्यावर’ बसवल्याचे दिसून येत आहे.
बहुतांश ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाने मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टीम बसवली आहे. याचा कर्णकर्कश आवाज रस्त्यावरून जाताना सर्रास ऐकावयास मिळतो. त्याचा नाहक त्रास नागरिकांना होतो. ऊस वाहतूक करणारी वाहने अपघाताला निमंत्रण देणारी ठरत असून, त्यांना कोणी तरी शिस्त लावण्याची गरज आहे. या साऱ्या प्रकाराकडे कोणत्याही यंत्रणेचे लक्ष नाही.