परळीतील ट्विस्ट; आधी समाधान मुंडेला मारहाण, मग बदल्यासाठी शिवराज दिवटेला बदडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 19:58 IST2025-05-19T19:57:41+5:302025-05-19T19:58:18+5:30
या घटनेला जातीय रंग देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

परळीतील ट्विस्ट; आधी समाधान मुंडेला मारहाण, मग बदल्यासाठी शिवराज दिवटेला बदडले?
बीड : परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. दिवटेला मारहाण करताना दिसणारा लांब केस असलेल्या समाधान मुंडे या तरुणाला आधी बेदम मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. या प्रकरणात परळीमध्ये गुन्हा दाखलची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. आधी मारहाण झाल्याने बदला घेण्यासाठीच दिवटेला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे, तर दुसऱ्या बाजूला या घटनेला जातीय रंग देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
१६ मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्यासाठी शिवराज दिवटे (वय १८, रा. लिंबोटी, ता. परळी) हा मित्रांसोबत गेला होता. तेथे किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचे अपहरण करून डाेंगरात नेत रिंगण करून बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर पायाही पडायला लावले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिवराजच्या जबाबावरून २० जणांवर गुन्हा दाखल झाला असून, सातजण पोलिसांच्या ताब्यात आहेत.
दरम्यान, जलालपूरमध्ये समाधानलाही मारहाण झाल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. याच व्हिडीओच्या आधारे आता तक्रार घेऊन मारहाण करणाऱ्या जमावाविरोधात परळीत गुन्हा दाखल केला जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.
गुन्हेगाराला जात नसते
दिवटे प्रकरणात काही लोकांनी आरोपींच्या आडनावावरून जातीय उल्लेख करीत सोशल मीडियावर वादंग उठवत जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. गुन्हेगारांना जात नसते. मानसिकता बदलण्याची गरज आहे. तसेच कोणीही असे प्रकार करून करिअर खराब करून घेऊ नये. शांतता राखावी. असे काही घडत असेल तर पोलिसांना कळवा. आम्ही २४ तास सेवेत आहोत. सोशल मीडियावरही वादग्रस्त पोस्ट करू नये, अन्यथा गुन्हा दाखल करू, असा इशारा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.
तक्रार येताच गुन्हा दाखल करू
दिवटे प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यात दोन अल्पवयीनसह सात आरोपी ताब्यात आहेत. आता समाधान मुंडे नावाच्या तरुणालाही मारहाण झाल्याचा व्हिडीओ आला आहे. त्यातही तक्रार येताच गुन्हा दाखल केला जाईल. तशी प्रक्रिया परळीत सुरू आहे.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड