परळीत नवे उर्जापर्व! जुन्या औष्णिक केंद्राच्या जागेत ५० मेगावॅट सौर प्रकल्पाला मंजुरी, निविदा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:02 IST2026-01-24T14:01:05+5:302026-01-24T14:02:22+5:30
परळी केंद्रातील ३० मेगावॅटचे दोन आणि २१० मेगावॅटचे तीन संच आयुर्मान संपल्यामुळे बंद करण्यात आले होते.

परळीत नवे उर्जापर्व! जुन्या औष्णिक केंद्राच्या जागेत ५० मेगावॅट सौर प्रकल्पाला मंजुरी, निविदा प्रसिद्ध
परळी (प्रतिनिधी): परळीच्या वैभवात भर घालणाऱ्या जुन्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेत आता सौर उर्जेचा भव्य प्रकल्प साकारणार आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या आणि निष्कासित करण्यात आलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत ५० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. महानिर्मिती (महाजनको) कंपनीने शनिवारी, २४ जानेवारी रोजी या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध केल्याने कामाला मोठी गती मिळाली आहे.
परळी केंद्रातील ३० मेगावॅटचे दोन आणि २१० मेगावॅटचे तीन संच आयुर्मान संपल्यामुळे बंद करण्यात आले होते. या संचांच्या साहित्याची भंगारात विल्हेवाट लावल्यानंतर ही मोकळी जागा वापराविना पडून होती. येथे ३५० मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारावा, अशी आग्रही मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रकल्प मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे.
रोजगाराची मोठी संधी
पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅट निर्मितीचे नियोजन असून, यामुळे परळी आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. कोळशावर आधारित केंद्राने परळीला ओळख दिली, आता तोच वारसा सौर उर्जेच्या माध्यमातून पुढे सुरू राहणार आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याबद्दल त्यांचे आभार मानले असून, हा प्रकल्प परळीच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
तिन्ही संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित
नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रत्येकी २५० मेगावॅट क्षमतेचे तिन्ही संच सध्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असून, एकूण ७५० मेगावॅट इतकी वीज निर्मिती सुरू आहे. शनिवारी दुपारी तिन्ही संच चालू होते. परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने तिन्ही संच पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.