बीडमध्ये राष्ट्रवादीचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा; मंत्री क्षीरसागर यांच्यावर पुतण्याचे शरसंधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:30 IST2019-06-17T13:29:53+5:302019-06-17T13:30:59+5:30
शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यास क्षीरसागर बंधूना ठरवले जबाबदार

बीडमध्ये राष्ट्रवादीचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा; मंत्री क्षीरसागर यांच्यावर पुतण्याचे शरसंधान
बीड : शहरातील पाणी टंचाईच्या विरोधात काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने नूतन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर शरसंधान केले आहे. शहरातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त असताना जयदत्त क्षीरसागर मात्र मागील दीड महिन्यांपासून मुंबईत तळ ठोकून होते, अशी टीका मंत्री क्षीरसागर याचे पुतणे तथा जिल्हापरिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केली.
बीड शहरात मागील अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात पुरेसा पाणीसाठा असताना देखील नगरपालिकेच्या नियोजना अभावी पाणी पुरवठा विस्कळीत आहे. शहरात पाणीपुरवठा वेळेवर होत नाही यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, मा.आ. सुनील धांडे, बबन गवते, हेमा पिंपळे, बीड नगरपालिकेतील काकू-नाना आघाडीचे नगरसेवक यांच्यासह शहरातील नागरिक, महिला डोक्यावर हंडा घेऊन नागरपालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीड शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा केला तरी देखील पाणी पुरेल मात्र, नगरपालिकेचे नियोजन ढिसाळ असून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच पुढील काळात जिल्ह्यातील राष्ट्रवादी विविध प्रश्नांवर आक्रमक होणार असून, प्रश्न सुटले नाही तर मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जातील असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिला. यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन दिले.