निसर्ग कोपला! ऐन हंगामात खिल्लार बैलजोडीचा वीज कोसळून मृत्यू, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रु
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 19:14 IST2024-06-06T19:14:30+5:302024-06-06T19:14:54+5:30
ऐन हंगामात बैलजोडीची सोबत नाही, आता शेती कशी कसायची या विचाराने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रु दाटून आले.

निसर्ग कोपला! ऐन हंगामात खिल्लार बैलजोडीचा वीज कोसळून मृत्यू, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रु
दिंद्रुड: माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथे गुरुवारी सायंकाळी जोरदार वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यात एका शेतकऱ्याची खिल्लार बैलजोड वीज कोसळल्याने ठार झाल्याची घटना घडली. ऐन पेरणीच्या हंगामात बैलजोडीची सोबत नसल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रु दाटून आले होते.
येथील शेतकरी बाबुराव किसनराव झोडगे शेतातील कामे आटोपून बैलगाडी सह घराकडे परतत होते. मात्र जोरदार वादळी वारा येऊन पाऊसही सुरू झाल्याने झोडगे शेतातच थांबले. त्यातच अचानक जोरदार आवाज होऊन वीज थेट बैलजोडीवर कोसळली. यात दोन्ही खिल्लार बैल जागीच ठार झाले. तर यावेळी एका सात वर्षाच्या मुलीला चटका बसून किरकोळ इजा झाली आहे. बैलजोडीच्या मृत्यूने शेतकऱ्याचे जवळपास दीड लाखांचे आर्थिक नुकसान झाले. महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करत पीडित शेतकऱ्याला मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.