नांदेडच्या तरुणाचा परळीत जीवन संपविण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच गळ्यावर ब्लेडने केले वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:48 IST2025-01-29T17:42:18+5:302025-01-29T17:48:54+5:30
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तरूणावर उपचार सुरू आहेत

नांदेडच्या तरुणाचा परळीत जीवन संपविण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच गळ्यावर ब्लेडने केले वार
परळी: पुण्याहून नांदेडकडे जात असलेल्या तरुणाने परळी रेल्वे स्थानकावर उतरून परळीच्या बस स्थानकाजवळ आत्महत्येच प्रयत्न केला. दत्ता दीपक गोंडेकर ( वय 24 वर्ष राहणार नांदेड ) असे सदरील युवकाचे नाव आहे. बुधवार दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारच्या वेळी स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार केले त्यामुळे दत्ता गोंडेकर हा रक्तबंबाळ झाला होता अशा अवस्थेत त्यास परळीच्या शहर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व्यंकट भताने यांनी तातडीने परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
परळीच्या उपजिल्हारुग्णालयात प्राथमिक उपचार करून दुपारी पाचच्या सुमारास अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे उपचार चालू आहेत. या संदर्भात दत्ता गोंडेकर यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी माहिती कळविली आहे. दत्ता दीपक गोंडेकर हा पुण्याहून परळीला रेल्वेने आला होता. तो आपल्या गावी नांदेडला जाणार होता. परंतु परळीच्या बसस्थानक जवळ गळ्यावर ब्लेडने वार करून जखमी करून घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नेमका हा काय प्रकार आहे ?कशामुळे त्याने हा प्रकार केला? याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.