आगरतांड्यावरील आगीचे गूढ उलगडले; आग लागली नव्हे, तर लावल्याचा अंनिसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:29 IST2025-01-24T19:28:27+5:302025-01-24T19:29:29+5:30
आगरतांडा येथे दहा दिवसांपासून घरातील संसारोपयोगी वस्तूंना आणि इतरही काही साहित्यांना अचानक आग लागण्याचा प्रकार सुरू होता.गुरुवारी आग लागण्याचा प्रकार बंद झाल्याचे आगर तांड्यावरील ग्रामस्थांनी सांगितले.

आगरतांड्यावरील आगीचे गूढ उलगडले; आग लागली नव्हे, तर लावल्याचा अंनिसचा दावा
चिंचाळा : वडवणी तालुक्यातील कुप्पा ग्रामपंचायतीअंतर्गत आगर तांड्यावर लागणाऱ्या आगीसंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य आणि बीड जिल्ह्याच्या टीमने तपास करत हा प्रकार मानवनिर्मित असल्याचे पटवून दिले. दरम्यान, गुरुवारी आग लागण्याचा प्रकार बंद झाल्याचे आगर तांड्यावरील ग्रामस्थांनी सांगितले.
आगरतांडा येथे दहा दिवसांपासून घरातील संसारोपयोगी वस्तूंना आणि इतरही काही साहित्यांना अचानक आग लागण्याचा प्रकार सुरू होता. दरम्यान, अंनिसच्या टीमने आगर तांडा येथे बुधवारी दिवसभर आग कशी लागते, कधी लागते आणि कशामुळे लागते, याचा शोध आणि निरीक्षण सुरू केले. आग लागत असलेल्या घरांची पाहणी करून आणि येथे राहणाऱ्या लोकांची विचारपूस सुरू केली. यानंतर हा प्रकार जादूटोण्याचा नसून कोणीतरी मुद्दाम ही आग लावत असल्याचे अंनिसकडून सांगण्यात आले. तांड्यावरील ग्रामस्थांना आग कशी लावली जाते, याची प्रात्यक्षिकेही करून दाखवली.
ही आग मानवनिर्मित
आगर तांड्यावर लागणारी आग त्याच परिसरातील खोडकर व्यक्तीकडून अंधश्रद्धा पसरविण्याच्या दृष्टीने लावण्यात येत होती. या ठिकाणी अंनिसच्या टीमने तपास पूर्ण केला आणि आग लावणारी व्यक्ती शोधून काढलेली आहे. या व्यक्तीचे फक्त नाव जाहीर केलेले नाही. येथून पुढे तांड्यावर आग लागणार नाही.
- माधव बागवे, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस.
गुरुवारी आगीची घटना नाही
आगर तांड्यावर दहा दिवसांपासून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी आग लागत होती. परंतु. बुधवारी अंनिसची टीम आणि पोलिस प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केल्यापासून येथे गुरुवारी दिवसभरात आग लागण्याची घटना घडली नाही.
- मानसिंग जाधव, ग्रामस्थ, आगरतांडा, कुप्पा.