बीडमधील बाजार समितीच्या गाळ्यात 'रहस्यमय' खजिना; बेवारस १ कोटींच्या गाडीचा मालक कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:31 IST2025-11-10T15:28:13+5:302025-11-10T15:31:00+5:30
निर्मनुष्य भागात हा गाळा असल्याने कार व इतर साहित्य कोणी आणून टाकले, हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

बीडमधील बाजार समितीच्या गाळ्यात 'रहस्यमय' खजिना; बेवारस १ कोटींच्या गाडीचा मालक कोण?
बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात असलेल्या एका गाळ्यामध्ये अलिशान चारचाकी आणि तेल रिफायनरीची यंत्रे आढळली आहेत. बेवारस चारचाकी व इतर साहित्य कोणी आणून टाकले, याचा शोध आता पेठ बीड पोलिस घेत आहेत. तर ही कार व साहित्य बीडमधील बंद पडलेल्या तेल फॅक्टरी मालकाचे तर नाही ना? अशी चर्चा लोक करीत आहेत.
बहिरवाडी भागात बाजार समितीमधील १०९ क्रमांकाचा गाळा महादेव देशमाने यांचा आहे. अनेक दिवसांनंतर ते त्यांचा गाळा उघडण्यासाठी गेले असता शटरच्या कुलुपास चावी लागली नाही. त्यानंतर ग्लेंडर कटरने कुलूप तोडले. शटर उघडून आत पाहिले असता त्यांना आत एक चारचाकी गाडी आणि विविध मशिनरी, यंत्रसामग्री, साड्या व कपडे दिसून आले. त्यामुळे देशमाने यांनी बाजार समिती कार्यालयात संपर्क केला. त्यानंतर त्यांनी पेठ बीड पोलिस ठाण्यात माहिती देऊन अर्ज दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाळ्याची पाहणी केली. प्राथमिक तपासात चारचाकी गाडीची किंमत सुमारे एक कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे समोर आले आहे. पोलिस निरीक्षक अशोक मुुदीराज, उपनिरीक्षक काकरवाल, हे. कॉ. जोगदंड, राऊत यांनी बाजार समितीमधील या गाळ्याची पाहणी करून पंचनामा केला. बेवारस वाहन व इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निर्मनुष्य भागात हा गाळा असल्याने कार व इतर साहित्य कोणी आणून टाकले, हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
चारचाकी, मशिनरीचा मालक कोण?
या गाडीचा आणि मशिनरीचा मालक कोण? तसेच गाळा मालकाच्या परवानगीशिवाय हे सर्व साहित्य गाळ्यात का व कोणी ठेवले? या वाहनाचा एखाद्या गुन्ह्यात वापर झाला आहे का?, कारवर नंबरप्लेट नसल्याने चेसी नंबरच्या आधारे मालकाचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी लोकमतला सांगितले.