माझ्या लेकीसह दोघी गेल्या, दुसऱ्यांच्या तरी वाचवा हो ! बीडच्या लाडक्या बहिणीला अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:54 IST2025-04-22T13:54:25+5:302025-04-22T13:54:45+5:30
उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्या बीडच्या लाडक्या बहिणीला अश्रू अनावर

माझ्या लेकीसह दोघी गेल्या, दुसऱ्यांच्या तरी वाचवा हो ! बीडच्या लाडक्या बहिणीला अश्रू अनावर
बीड : शिक्षणात हुशार, पण टवाळखोरांनी जाळे टाकून तिला प्रेमाचे आमिष दाखवून छळ केला. नंतर फोटो व्हायरलची धमकी देत ब्लॅकमेल केले. याच त्रासाला कंटाळून माझ्या लेकीने गळफास घेतला. तिच्या दोन मैत्रिणींनीही आत्महत्या केली, पण ते समोर आले नाहीत. माझ्या लेकीसह दोघी गेल्या, पण दुसऱ्यांच्या तरी वाचवा हो.. अश्रू ढाळत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिणाऱ्या बीडमधील कोयना विटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोयना विटेकर यांचा प्रेमविवाह. त्यांची मोठी मुलगी साक्षी कांबळे ही बीडमधील केएसके महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय शाखेत शिक्षण घेत होती. हवाईसुंदरी होण्याचे तिचे स्वप्न होते. पण बीडमधीलच अभिषेक कदम याने तिला ब्लॅकमेल केले. याला कंटाळून तिने मामाच्या गावी जाऊन धाराशिवमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अभिषेक आणि त्याची पोलिस बहीण शीतल कदम यांच्यावर ॲट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हाही दाखल झाला. परंतु उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी आरोपीला अभय देऊन त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचाही आरोप कोयना यांनी केला आहे.
आरोपींसह डीवायएसपींवर कारवाई करा
माझ्या मुलीचा जीव घेणाऱ्या अभिषेक आणि शीतल कदम यांना कठोर शिक्षा द्यावी. त्यांना फाशी झाली पाहिजे. तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि आम्ही विचारणा करण्यास गेल्यावर उद्धट वर्तन करून बाहेर हाकलणाऱ्या उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्यावर कारवाईची मागणीही काेयना यांनी केली आहे.
त्या दोघींचे नावेही माहिती
माझ्या साक्षीप्रमाणेच केएसके महाविद्यालयातील इतर दोन मुलींनीदेखील छेडखानीला कंटाळून आत्महत्या केली. परंतु त्यांचे नातेवाईक समोर येत नाहीत. त्यांची नावे मला साक्षीने सांगितले होते. एक बीड शहरातील असून दुसरी ग्रामीण भागातील आहे. छेडखानी करणारी टोळीच सक्रिय आहे.
बीडच्या एसपींना भेटणार
अभिषेक कदमसह इतर छेडखानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आपण बीडच्या पोलिस अधीक्षकांना मंगळवारी भेटणार आहोत. त्यांना सर्व पुरावे देणार असल्याचेही कोयना यांनी सांगितले.
बीड पोलिसांचा धाकच नाही
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात खून, मारामारी, अत्याचार, छेडछाड असे अनेक गंभीर गुन्हे वाढत आहेत. पोलिसांचा धाक नसल्यानेच आरोपींचे मनोबल वाढत आहे. पोलिस अधीक्षक बदलले तरी जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी झालेली नाही. बीड पोलिसांचा नाकर्तेपणा या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.