टँकरच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे केज तहसील कार्यालयात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 17:48 IST2019-01-03T17:42:12+5:302019-01-03T17:48:03+5:30
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांनी आज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली.

टँकरच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे केज तहसील कार्यालयात आंदोलन
केज (बीड ) : तालुक्यातील कानडी माळी व साबला येथे गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. यामुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र टँकर पुरवठा सुरु झाला नाही यामुळे येथील ग्रामस्थांनी आज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली.
कानडी माळी व साबला येथे तीव्र पाणीटंचाई आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी कानडी माळीचे सरपंच अमर राऊत व साबला चे सरपंच सिंधुबाई महादेव कटारे यांनी पंचायत समितीमध्ये 22 नोव्हेंबर 2018 रोजी प्रस्ताव दाखल केला. मात्र, यावर कारवाई झाली नाही.
आज दोन्ही गावातील महिला व नागरीकांनी तहसील कार्यालयासमोर रिकामे हंडे व घागरी घेऊन सकाळी अकरा वाजेपासून आमरण उपोषणाला सुरवात केली. प्रशासन टँकर सुरु करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. टँकर सुरु करण्यात चालढकल करत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आजपर्यंत ग्रामस्थांची फसवणूक केली आहे अशी प्रतिक्रिया सरपंच अमर राऊत यांनी यावेळी दिली.
सायंकाळपर्यंत दोन्ही गावात टँकर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रविंद्र तुरुकमारे यांनी दिली आहे.