Movement of farmers of Beed district in Pune for insurance | विम्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुण्यात आंदोलन
विम्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुण्यात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : जिल्ह्यात गतवर्षी पडलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन पिकासह सर्वच पिके करपून गेली. शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीकडे विमा भरला, मात्र अद्याप ही या शेतक-यांना विम्याची रक्कम अदा करण्यात न आल्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन केले. यावर कंपनीने महिन्यात शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले.
आपल्या पिकाचे विमा संरक्षण ही शेतक-यांनी काढले होते. जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे काम दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीला दिले होते. सर्व पिके दुष्काळामुळे गेली असताना यावर्षी पेरणीचे दिवस आले असताना विमा कंपनीने विम्याची रक्कम शेतक-यांना अदा केली नाही. वारंवार प्रशासनासह विमा कंपनीकडे पैशाची मागणी करून प्रशासन व विमा कंपनी दाद मिळत नव्हती. यावर शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभिषण थावरे यानी पुढाकार घेत शेकडो शेतक-यांसह सोमवारी थेट पुणे येथील दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीच्या मुख्यालयावर मोर्चा नेला. आमच्या हक्काचे पैसे द्या, अशी मागणी करत कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन केले. अखेर महिनाभरात विम्याची रक्कम खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापकांनी दिले.


Web Title: Movement of farmers of Beed district in Pune for insurance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.