लग्नघरावर शोककळा! मुलाचे तीन दिवसांवर लग्न आलेले असताना वरबापाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 11:59 IST2023-06-07T11:54:23+5:302023-06-07T11:59:09+5:30
तीक्ष्ण हत्याराने भोसकून वृद्धाची हत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना

लग्नघरावर शोककळा! मुलाचे तीन दिवसांवर लग्न आलेले असताना वरबापाची हत्या
धारूर/अंबाजोगाई - तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारातील एका शेतात ५८ वर्षीय वृद्धाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. दत्तात्रय रामा गायके (वय ५८, रा. केंद्रेवाडी, ता. अंबाजोगाई) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास हा खून झाल्याचा अंदाज आहे.
दत्तात्रय गायके यांच्या मुलाचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले होते. लग्नानिमित्त त्यांच्या दोन्ही मुली आणि जावई घरी आले होते. घटनास्थळी जावयाची मोटारसायकल आढळून आली असून घटना घडल्यापासून जावई फरार असल्याने संशयाची सुई जावयावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कोणत्या कारणास्तव हा खून झाला हे अद्याप निष्पन्न झाले नसून धारूर पोलीस पुढील तपास करत आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह सध्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
दरम्यान, माहिती मिळताच सपोनि विजय आटोळे यांनी उपनिरिक्षक संतोष भालेराव यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत यांनी देखील घटनास्थळी भेट देत तपासाबाबत काही सूचना केल्या. आरोपी जवळच्या नात्यातील असण्याची शक्यता सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. अटोळे यांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरु आहे.