खेळण्याच्या वयातच मातृत्व! बीड जिल्ह्यात बालविवाह झालेल्या १५ वर्षाच्या दहा मुली गर्भवती
By सोमनाथ खताळ | Updated: May 15, 2025 15:22 IST2025-05-15T15:21:40+5:302025-05-15T15:22:34+5:30
पालक अजूनही आपल्या मुलींचे हात अवघ्या १३ व्या वर्षीही पिवळे करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच खेळण्याच्या वयातच त्यांच्यावर मातृत्वाचे ओझे पडत आहे.

खेळण्याच्या वयातच मातृत्व! बीड जिल्ह्यात बालविवाह झालेल्या १५ वर्षाच्या दहा मुली गर्भवती
बीड : जिल्ह्यातील बालविवाह काही केल्या थांबत नसल्याचे उघड झाले आहे. अगदी शिक्षण, खेळण्याच्या वयातच पालक मुलींचे हात पिवळे करत असल्याने अवघ्या १५ व्या वर्षीही मुली गर्भवती राहत आहेत. मागील वर्षात १८ वर्षांखालील १२ मुली गर्भवती असून, त्यातील १० जणी १५ वर्षांच्या आहेत. याची आरोग्य विभागात नोंद झाल्याने ही गंभीर समस्या उघड झाली आहे. ही परिस्थिती राज्यभरातच आहे, परंतु प्रशासन अहवाल समाेर आणत नाही.
बालविवाहासंदर्भात जनजागृतीसाठी शासन कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करते. तसेच बालविवाह रोखण्यासह झालेल्यांवर बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातात. परंतु, असे असले तरी बीडमधील ही गंभीर समस्या काही केल्या कमी होत नसल्याचे दिसते. पालक अजूनही आपल्या मुलींचे हात अवघ्या १३ व्या वर्षीही पिवळे करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच खेळण्याच्या वयातच त्यांच्यावर मातृत्वाचे ओझे पडत आहे. विशेष म्हणजे याची शासनदरबारी नोंद होत आहे.
११ मुलींची प्रसूती
जिल्हा रुग्णालयात १३ ते १७ वर्षांतील ११ मुलींची प्रसूतीही झाली आहे. यातील काही मुली या अत्याचार पीडित असल्याचे सांगण्यात आले.
आरसीएच पोर्टलला नोंद
गर्भवती महिलांची नोंद ही आरसीएच (प्रजनन व बाल आरोग्य) पोर्टलवर केली जाते. यावरूनच अगदी १५ वर्षांच्या मुली गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. हे आरोग्य विभागाचे अधिकृत पोर्टल आहे.
कुठल्या आहेत गर्भवती मुली
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत १२ मुलींची गर्भवती म्हणून नोंद झाली आहे. यात बीड तालुक्यातील ४, गेवराई २, वडवणी २ आणि आष्टी, केज, धारूर, शिरूकासार येथील प्रत्येकी एकीचा समावेश आहे.
बालविवाह कशावरून?
आरसीएच पोर्टलला नोंद करताना सर्व अधिकृत पुरावे द्यावे लागतात. यात पतीचाही पुरावा असतो. या सर्व १२ मुलींच्या नावापुढे त्यांच्या पतीचे नावही लिहिलेले आहे.
दोषी कोणाला धरायचे?
पालकांनीच मुलीचा बालविवाह लावलेला असतो. आता अल्पवयीन असतानाच गर्भवती राहिल्याने पीडितेने किंवा तिच्या आई-वडिलांनी तक्रार देणे अपेक्षित असते. परंतु, यात पालकही दोषी असतात. कारण त्यांनीच बालविवाह लावलेला असतो. त्यामुळे नेमका दोष कोणाला द्यायचा? हा प्रश्न आहे.
इतर जिल्ह्यातून २३ गुन्हे वर्ग
बीड जिल्ह्यात विवाह लावून परजिल्ह्यात कामासाठी अथवा इतर कारणांसाठी स्थलांतरित झालेल्या अल्पवयीन मुलींची तिकडे प्रसूती झाली. यावेळी डॉक्टरांनी अहवाल दिल्याने पतीविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. तो गुन्हा नंतर बीडमध्ये वर्ग केला. २०२२ ते मार्च २०२५ या कालावधीत हा आकडा २३ आहे. यात पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, जालना आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.
१८ वर्षांखालील मुलगी गर्भवती असेल किंवा प्रसूती झाली तर त्याचा अहवाल आपण पोलिसांना देतो. मग पुढील कारवाई ते करतात.
- डॉ. संतोष शहाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
अल्पवयीन मुलीसंदर्भात काही अहवाल आला तर आम्ही कारवाई करतोच. पण जोपर्यंत अहवाल येणार नाही, तोपर्यंत काही समजणार नाही.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड