अडीच महिन्याच्या ‘नकोशी’ला रस्त्यावर सोडून माता फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 17:09 IST2019-05-28T17:03:19+5:302019-05-28T17:09:30+5:30
गेवराई तालुक्यातील घटना : चिमुकलीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

अडीच महिन्याच्या ‘नकोशी’ला रस्त्यावर सोडून माता फरार
बीड : एकीकडे मुलगी वाचवा, मुलगी शिकवा असा नारा दिला जात असताना दुसऱ्या बाजुला आजही समाजाची मानसिकता बदलली नसल्याचे समोर आले आहे. एका अडीच महिन्याच्या जिवंत मुलीला रस्त्यावर सोडून देत माता फरार झाली. ही घटना गेवराई तालुक्यातील पाडळसिंंगीजवळील टोलनाका परिसरात मंगळवारी पहाटे उघडकीस आली. ग्रामस्थांनी या चिमुकलीला ताब्यात घेऊन जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
पाडळसिंगीजवळील टोलनाका परिसरात एका बाळाचा रडण्याचा आवाज याच भागात राहणाऱ्या नागरिकांच्या कानी पडला. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांना एक मुलीला टॉवेलमध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला टाकलेले दिसले. हा प्रकार ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ आयआरबी कंपनीच्या रूग्णवाहिकेला संपर्क केला. ते अवघ्या पाच मिनीटांत पोहचले आणि चिमुकलीला घेऊन पहाटे ५ वाजता जिल्हा रूग्णालयात आले. येथील डॉ.मोहिणी जाधव व त्यांच्या टिमने या चिमुकलीवर तात्काळ उपचार केले. सध्या या बाळाची प्रकृती ठणठणीत असून अद्याप याची पोलीस दप्तरी नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.
‘त्या’ प्रकरणाचा तपास अद्यापही अपूर्णच
बीड तालुक्यातील कपीलधारवाडी येथे पंधरा दिवसांपूर्वी दोन दिवसांचे जिवंत स्त्री जातीचे अर्भक आढळले होते. या बाळावर उपचार करून नंतर शिशुगृहात पाठविण्यात आले होते. हे बाळ कोणी टाकले, याचा तपास मात्र, अद्यापही बीड ग्रामीण पोलिसांना लागलेला नाही.
डॉक्टर, ग्रामस्थांकडून मायेची उब
चिमुकली सापडताच ग्रामस्थांनी तिला जवळ घेऊन दुध पाजले. जिल्हा रूग्णालयात आल्यावर डॉ.मोहिणी जाधव-लांडगे, परीचारीका मोहोर डाके, मिरा नवले यांनी तिला आंघोळ घालून उपचार केले. तसेच मायेची उबही दिली. बाळाचे वजन साडे तीन किलो असून तिची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉ.जाधव यांनी सांगितले. फरताडे अमोल, गणेश काळे, सोनू देवडे आयआरबीच्या या कर्मचाऱ्यांनीही मदत केली.