आईसाठी तो बिबट्याला भिडला; तुरीच्या शेंगा तोडत असताना झालेल्या हल्ल्यात महिला सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 19:18 IST2020-11-28T19:17:23+5:302020-11-28T19:18:55+5:30
आष्टी तालुक्यात बिबट्याची पुन्हा दहशत

आईसाठी तो बिबट्याला भिडला; तुरीच्या शेंगा तोडत असताना झालेल्या हल्ल्यात महिला सुखरूप
- नितीन कांबळे
कडा ( बीड ) : तुरीच्या शेंगा तोडत असताना अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आई किरकोळ जखमी झाली आहे. मुलाने प्रसंगावधान राखल्याने आईचा जिव सुरक्षित राहिला. ही घटना मगरूळ येथे शनिवारी सांयकाळी घडली. शिलावती दत्तात्रय दिंडे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथील महिला शिलावती दत्तात्रय दिंडे या आपल्या मुलासोबत शेतात तुरीच्या शेंगा तोडत होत्या. सायंकाळची वेळ झाल्याने त्या आवराआवर करत होत्या. अचानक त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला. मात्र, मूलाने प्रसंगावधान राखत तुरीची पळाटी उपटून आरडाओरडा करत बिबट्यावर चाल केली. यामुळे बिबट्या तेथून निघून गेला आणि आईचा जिव वाचवला. हल्ल्यामुळे त्यांच्या हातावर जखम झाली आहे. तसेच त्या घाबरून गेल्या. त्यांच्यावर आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याने पुन्हा एकदा केलेल्या हल्ल्याने दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे यांनी केली आहे.
मुलगा बिबट्याला भिडला
आईवर हल्ला झाल्यानंतर मोठ्या धीराने बिबट्याला सामोरे गेलो नसता मोठी दुर्दैवी घटना घडली असे अभिषेक दत्तात्रय दिंडे याने लोकमतला सांगितले. याबाबत आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांच्याशी संपर्क झाला नाही.