मोबाईल, घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:32 IST2019-01-25T00:31:22+5:302019-01-25T00:32:20+5:30
घराला कुलूप न लावता हळदी-कुंकवाला जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. चोरट्याने घरात प्रवेश करून रोख रकमेसह दागिने लंपास केले. त्यानंतर अवघ्या तीन तासात बीड शहर पोलिसांनी तपास करून अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या.

मोबाईल, घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : घराला कुलूप न लावता हळदी-कुंकवाला जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. चोरट्याने घरात प्रवेश करून रोख रकमेसह दागिने लंपास केले. त्यानंतर अवघ्या तीन तासात बीड शहर पोलिसांनी तपास करून अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या.
सोहेल समद खान (२३, रा.भाजीमंडई, बीड) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. २२ जानेवारी रोजी रात्री ७ वाजता अभिजित मस्कर (रा. कबाडगल्ली, बीड) हे मित्रांसह बाहेर गेले होते. त्यांची पत्नीही मुलांना घेऊन स्वराज्यनगर भागात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या. मात्र, लवकरच परत येणार असल्याने त्यांनी घराला कुलूप लावले नाही. हीच संधी साधून सोहेलने घरात प्रवेश करीत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा साडेसात हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. अभिजित घरी आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ बीड शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून सोहेलला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचे तब्बल १३ मोबाईल मिळून आले. त्याला गुरूवारी दुपारी न्यायालयात हजर केले.