किरकोळ कारण; धारूरमध्ये बिअरबारसमोरच सराफा व्यापाऱ्याचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 20:45 IST2023-07-02T20:45:31+5:302023-07-02T20:45:50+5:30
या प्रकरणांमध्ये नातेवाईकांनी पोलीसात धाव घेवून आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती.

किरकोळ कारण; धारूरमध्ये बिअरबारसमोरच सराफा व्यापाऱ्याचा खून
धारूर : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात धारूरमधीलच सराफा व्यापाऱ्याचा खून झाल्याची घटना धारूर येथील तेलगाव रोड येथील विजय बिअर बार येथे रविवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
धारूर येथील तेलगाव रोड लगत विजय बियरबार आहे. या ठिकाणी धारूर येथील नितीन मोहन धोत्रे (वय ४०) वर्षे व इतर काही जणांमध्ये रविवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास भांडण झाले. या भांडणांमध्ये नितीन धोत्रे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भर रस्त्यावर झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे धारूर शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.
नितीन धोत्रे यांचे धारूर शहरात सराफा दुकान आहे. या प्रकरणांमध्ये नातेवाईकांनी पोलीसात धाव घेवून आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. खुनाबद्दल मात्र नेमके कारण समजू शकले नाही. सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस. अटोळे यांना विचारणा केली असता एकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.