लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुगणांची संख्या वाढत आहे. या आजारात गंभीर स्वरूपात आजारी असणाऱ्या रुग्णांना इंजेक्शन रेमडिसिविर, मेरोपेनाम, हेपेरिन ही महाग औषधे वापरावी लागतात. या औषधांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ही इंजेक्शन्स ड्रग्स प्राईस कंट्रोल ऑर्डर अर्थात औषधी मूल्य नियंत्रण कायद्याखाली आणून त्यांच्या किमती सर्वसामान्य माणसाला परवडतील अशा ठेवाव्यात, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले यांनी आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात या औषध कंपनी कोरोनाच्या परिस्थितीचा लाभ घेत कधी औषधांचा कृत्रिम तुटवडा करत किमतीत प्रचंड वाढ करत जीवनावश्यक औषध विक्री करत आहेत. त्यामुळे या औषधांना औषधी मूल्य नियंत्रण कायद्यात आणणे गरजेचे आहे, असे मत डॉ. इंगोले यांनी व्यक्त केले आहे.