मांस नष्ट करायला गेले अन् टेम्पो बदलून आले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:04 IST2019-02-04T00:03:29+5:302019-02-04T00:04:40+5:30
आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक आयशर टेम्पो जप्त केला होता. मात्र आष्टी पोलिसांनी गलथानपणा करीत कारवाईतील टेम्पोच बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मांस नष्ट करायला गेले अन् टेम्पो बदलून आले!
बीड / कडा : आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक आयशर टेम्पो जप्त केला होता. मात्र आष्टी पोलिसांनी गलथानपणा करीत कारवाईतील टेम्पोच बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मांस नष्ट करायला नेल्यानंतर अवघ्या तासाभरात हा ‘चेंज’ झाल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.
आष्टी तालुक्यातील खडकत येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना कत्तलखाना चालतो. याच ठिकाणी प्राण्यांची कत्तल करून मांसाची परराज्यात विक्री केली जाते. हीच माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख रामकृष्ण सागडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना दिली होती. त्यानंतर छापा टाकून चार टन मांसाने भरलेला टेम्पो (एमएच ४२ एक्यू ९८२५) जप्त केला होता. याप्रकरणी पोउपनि सागडे यांच्या फिर्यादीवरून आमिर बाबुराव शेख, मोहमंद फारूकखान मोहमद खलील, मुजाहिर जब्बार कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, कारवाईनंतर आष्टी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मांसाने भरलेला टेम्पो जवळीच गायरानात नेला. येथे मांसाची विल्हेवाट लावली. यावेळी तपासी अंमलदार पोना केदार आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
मांस घेऊन जाताना टेम्पो एक आणि परत आणल्यावर टेम्पो वेगळाच असल्याचे समोर आले. केवळ तासाभरात ‘चेंज’ करण्याची प्रक्रिया ‘सोयीस्कर’पणे पार पाडल्याचे सांगण्यात आले.
खात्रीसाठी डीवायएसपी आष्टीकडे रवाना
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले, याबाबत खात्री केली जाईल. त्यासाठी डीवायएसपींना सांगितले आहे.
तर आष्टीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक डॉ.अर्जून भोसले म्हणाले, याची खात्री करण्यासाठी आष्टीला जात आहे. तेथे गेल्यावरच खरा प्रकार समोर येईल.
तपासी अंमलदार पोना केदार म्हणाले, मांस नष्ट केले आहे. टेम्पोत बदल झालेला नाही.