परळीत वैद्यनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात शिजविले मांस, भाविकांत संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 19:16 IST2025-06-02T19:14:40+5:302025-06-02T19:16:11+5:30

गोमूत्र शिंपडून जागेचे शुद्धीकरण; घटनेनंतर संबंधित कामगारांना परत पाठविल्याचे गुत्तेदाराने सांगितले.

Meat cooked in the darshan pavilion of Vaidyanath temple in Parli, anger among devotees | परळीत वैद्यनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात शिजविले मांस, भाविकांत संताप

परळीत वैद्यनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात शिजविले मांस, भाविकांत संताप

परळी : देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पूर्वेकडील बाजूस दर्शन बारी मंडप इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या तीन बांधकाम कामगारांनी शनिवारी रात्रीच्या वेळी मांस शिजवून ते खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, रविवारी अपवित्र झालेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, घटनेनंतर संबंधित कामगारांना परत पाठविल्याचे गुत्तेदाराने सांगितले.

परळी येथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आहे. या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून दर्शन बारी मंडपाचे बांधकाम सुरू आहे. महाराष्ट्रात मजूर मिळत नसल्याने कंत्राटदाराने पश्चिम बंगालचे मजूर आणले. याच मजुरांनी शनिवारी मंडपाच्या ठिकाणी मांस शिजवून ते खाल्ले. हा प्रकार सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आला. त्यानंतर याचे पडसाद रविवारी उमटले. ॲड. अरुण पाठक, व्यंकटेश शिंदे, रमेश चोंडे, मोहन राजमाने यांच्यासह शिवभक्तांनी गोमूत्र शिंपडत ही जागा शुद्ध केली. तसेच दुपारी एक वाजता आंदोलन करत निषेध नोंदविला. 

या प्रकाराने भाविकांच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न झाला असून, गुत्तेदार व संबंधित कामगार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजयुमोचे राज्याध्यक्ष ॲड. अरुण पाठक यांनी केली. तसेच कारवाईची मागणी प्रशासनाकडे केलेली असून, खराब केलेल्या जागेत गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केल्याचा दावा शिवसेना शिंदेगटाचे तालुकाप्रमुख व्यंकट शिंदे यांनी केला आहे.

Web Title: Meat cooked in the darshan pavilion of Vaidyanath temple in Parli, anger among devotees

टॅग्स :Beedबीड