बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य अबाधित रहावे; संत वामन भाऊंच्या चरणी धनंजय मुंडेंची प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:32 IST2025-01-22T13:26:24+5:302025-01-22T13:32:07+5:30
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामन भाऊंच्या पुण्यतिथी निमित्त धनंजय मुंडे यांच्या हस्ते पारंपारिक महापूजा करण्यात आली

बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य अबाधित रहावे; संत वामन भाऊंच्या चरणी धनंजय मुंडेंची प्रार्थना
पाटोदा (बीड) : श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित महापुजेस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आज उपस्थित राहिले. यावेळी आपल्या बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम अबाधित राहावा, अशी प्रार्थना गहिनीनाथ महाराज व संत वामन भाऊ यांच्या चरणी केली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे आज संत वामन भाऊ यांचा 49 वा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात आहे. मागील साधारण 20 ते 25 वर्षांपासून पुण्यतिथीच्या दिवशीच्या महापूजेचा मान धनंजय मुंडे यांना आहे. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी धनंजय मुंडे हे पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रात्रीच गहिनीनाथ गड येथे दाखल झाले. पहाटेच्या विशेष महापूजेनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची ऊर्जा मला गोरगरिबांची सेवा करण्याचे बळ देते, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
अन दोघांनीही एकमेकांना बांधला फेटा
दरम्यान, संत वामन भाऊ यांच्या समाधीची महापूजा पार पडल्यानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी वारकरी संप्रदायाची ओळख असलेला मानाचा फेटा धनंजय मुंडे यांना बांधला. तर गडाचे महंत म्हणून धनंजय मुंडे यांनी विठ्ठल महाराज शास्त्री यांनाही तसाच फेटा स्वतःच्या हाताने बांधला. यावेळी संत वामन भाऊ यांच्या नावाचा जयघोष उपस्थित भाविकांनी केला.