माजलगाव धरणातून बेसुमार पाणीउपसा; हजारो मोटारी रात्रंदिवस सुरू, कारवाई कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:05 IST2025-05-10T13:04:49+5:302025-05-10T13:05:26+5:30

बेसुमार पाणीउपस्यावर प्रशासनाकडून कसलीही कारवाई नाही

Massive water withdrawal from Majalgaon Dam; Thousands of pumps running day and night, who will take action? | माजलगाव धरणातून बेसुमार पाणीउपसा; हजारो मोटारी रात्रंदिवस सुरू, कारवाई कोण करणार?

माजलगाव धरणातून बेसुमार पाणीउपसा; हजारो मोटारी रात्रंदिवस सुरू, कारवाई कोण करणार?

- पुरुषोत्तम करवा
माजलगाव :
परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे पावसाळा संपला तेव्हा धरणात ८५ टक्के पाणी उपलब्ध होते. धरणाच्या पाण्यावर शेतीसाठी बेसुमार उपसा व बाष्पीभवन झाल्यामुळे मागील चार महिन्यांत ६२ टक्के पाणीसाठा कमी झाला. हे पाणी आरक्षित करणे आवश्यक असताना रात्रंदिवस या पाण्यावर उपसा सुरूच असताना प्रशासनाकडून काहीच कारवाई केली जात नाही.

माजलगाव धरणातून धरणाखालील भागातील शेतकऱ्यांसाठी रब्बीसाठी ३ व उन्हाळी २ पाणीपाळी कॅनालद्वारे देण्यात आली. तर परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी तीनवेळा पाणी देण्यात आले. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जानेवारी महिन्यात ६९.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यावेळी धरणात एकूण पाणीसाठा ३५८ दलघमी व २१६ दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा होता. त्यावेळी ०.१७ दलघमी एवढे बाष्पीभवन होत होते. या धरणात बुधवारी धरणात ७.८२ टक्केच पाणी शिल्लक असून, उपयुक्त पाणीसाठा हा २४.४० दलघमी आहे. सध्या धरणात एकूण पाणीसाठा १६६.४० दलघमी एवढाच शिल्लक आहे. सध्या या धरणातून ०.२६ दलघमी एवढे बाष्पीभवन होत असल्याचे सांगण्यात आले.

बीड, माजलगाव शहरासह ८० गावांना वरदान
माजलगाव धरणातून बीड, माजलगाव शहरास ७० ते ८० गावांतील लोकांसाठी वरदान आहे. सध्या धरणाची पाण्याची पातळी केवळ आठ टक्के असतानाही येथून अवैधरीत्या पाणीउपसा केला जात आहे. असे असताना संबंधित विभागाचे अधिकारी व येथील महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

नदीपात्रातूनदेखील मोठ्या प्रमाणात पाणीउपसा
माजलगाव धारणाखालोखाल असलेल्या सिंदफना व गोदावरी नदीपात्रातूनदेखील मोठ्या प्रमाणावर पाणीउपसा सुरू असून, नदीपात्रातील पाणीचोरीवरदेखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कागदावरच
तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी धरणातील पाणीउपसा करू नये, यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले होते. परंतु, त्यांच्याकडून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक धरणांमधून राजरोसपणे पाणीउपसा केला जात आहे. हे असेच सुरू राहिले तर काही दिवसांत धरणे कोरडे पडण्याची भीती आहे.

पाणी आरक्षित नाही
धरणाचे पाणी हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरक्षित केले जाते. परंतु, सध्या तरी हे पाणी आरक्षित करण्यात आलेले नाही. मागील वर्षभराच्या कार्यकाळात विनापरवाना चालणाऱ्या मोटारीवर एकही कारवाई करण्यात आलेली नाही.
-प्रवीण चौघुले, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग

Web Title: Massive water withdrawal from Majalgaon Dam; Thousands of pumps running day and night, who will take action?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.