सरपंच संतोष देशमुख यांचा पीएम रिपोर्ट सीआयडीकडे; अहवालात काय म्हटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:41 IST2024-12-19T11:39:47+5:302024-12-19T11:41:35+5:30

आरोग्य विभागाने सोपविला आठ पानांचा अहवाल : डोळे जाळल्याच्या चर्चांवर अहवालात काय आहे नमूद?

Massajog Sarpanch Santosh Deshmukh's PM report to CID; What did the report say? | सरपंच संतोष देशमुख यांचा पीएम रिपोर्ट सीआयडीकडे; अहवालात काय म्हटले?

सरपंच संतोष देशमुख यांचा पीएम रिपोर्ट सीआयडीकडे; अहवालात काय म्हटले?

बीड : मारहाण करून डोळे मेणबत्तीने जाळून काढले, फोडले अशा चर्चा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पसरल्या होत्या; परंतु शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे झालेल्या अति रक्तस्रावाने हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. आठ पानांचा हा अहवाल मंगळवारी सीआयडीकडे आरोग्य विभागाने सुपुर्द केला आहे.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. हे प्रकरण राज्यभर गाजले. देशमुख यांच्या अंगावर मारहाण झालेले काही कथित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकही आक्रमक झाले. आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात होती. आता देशमुख यांचा पीएम रिपोर्ट सीआयडीला दिला आहे. यात शरीराच्या वेगवेगळ्या भागावर मुकामार दिल्याने अति रक्तस्राव झाला. त्यात ते शॉकमध्ये गेल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद केले आहे, तसेच डोळे जाळले, काढल्याच्या चर्चांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दुजाेरा दिला नाही.

अहवालात काय म्हटले?
संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण 'हॅमरेज ॲण्ड शॉक ड्यू टू मल्टीपल इंन्ज्युरिज' असे नमूद केले आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार अनेक ठिकाणी मारहाण झाल्यामुळे रुग्ण शॉकमध्ये गेला आणि मृत्यू झाला, असा याचा अर्थ होतो.

मारहाणीमुळे डोळ्याचा भाग काळा-निळा
देशमुख यांच्या छातीवर, पाठ, हात, पाय, चेहरा, डाेके यावर मुकामार होता. चेहऱ्यावर आणि त्यातही डोळ्यावर मारहाण झाल्याने खालचा व वरील भाग काळा-निळा झाला होता. हेच पाहून काही लोकांनी डोळे काढले, जाळल्याच्या चर्चा सुरू केल्या होत्या; परंतु यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना विचारणा केल्यावर त्यांनी याला दुजोरा दिला नाही.

तिघांच्या समितीने दिला अहवाल
९ डिसेंबरला हत्या झाल्यानंतर समर्थकांसह नातेवाइकांनी आंदोलन केले. त्यामुळे १० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता शवविच्छेदन करण्यास सुरुवात झाली. साधारण तासभर ही प्रक्रिया चालली. डॉ.समाधान घुगे, डॉ.सुलतान हुसेन आणि डॉ.सचिन राऊत या तीन डॉक्टरांच्या समितीने शवविच्छेदन व अहवाल देण्याची प्रक्रिया पार पाडली. आता याचा व्हिसेरा राखीव ठेवला असून, त्याचा अहवाल येण्यास साधारण दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे.

शरद पवार मस्साजोगला येणार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील मस्साजोगला येऊन मयत सरपंच देखमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच आ. रोहित पवार यांनी मस्साजोगला भेट दिली होती.

चौथा आरोपी पकडला
या प्रकरणात जयराम माणिक चाटे (वय २१, रा. तांबवा, ता. केज), महेश सखाराम केदार (२१, रा. मैंदवाड, ता. धारूर), सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (दोघे, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा आंधळे (रा. मैंदवाडी, ता. धारूर), विष्णू चाटे, अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील जयराम, महेश आणि प्रतीकला यापूर्वीच अटक केली होती. यातील चौथा आरोपी विष्णू चाटे याला बुधवारी सकाळी बीड शहराजवळ ताब्यात घेतले. या प्रकरणात अजून तीन आरोपी फरार आहेत.

Web Title: Massajog Sarpanch Santosh Deshmukh's PM report to CID; What did the report say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.