मस्साजोग सरपंच हत्याप्रकरण; सीआयडीच्या पथकांचा देशभरात तपास, मारहाणीचे व्हिडिओ हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:24 IST2024-12-30T13:24:03+5:302024-12-30T13:24:53+5:30

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद बीडच नव्हे तर राज्यभर उमटत आहेत.

Massajog Sarpanch murder case; Nine CID teams investigating across the country, 4 videos of the beating recovered | मस्साजोग सरपंच हत्याप्रकरण; सीआयडीच्या पथकांचा देशभरात तपास, मारहाणीचे व्हिडिओ हाती

मस्साजोग सरपंच हत्याप्रकरण; सीआयडीच्या पथकांचा देशभरात तपास, मारहाणीचे व्हिडिओ हाती

बीड : मस्साजोग सरंपच हत्या, दोन कोटी रुपयांची खंडणी या दोन गुन्ह्यांत आरोपी असलेल्या वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक खाते सीआयडीकडून फ्रीज करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या शोधासाठी सीआयडीचे नऊ पथके देशभरात धावपळ करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद बीडच नव्हे तर राज्यभर उमटत आहेत. यासह दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. कराडला अटक करून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी शनिवारी मोर्चातून करण्यात आली होती. हेच गांभीर्य लक्षात घेऊन सीआयडीने तपासाची गती आणखी वाढविल्याचे दिसत आहे. हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि खंडणीतील वाल्मीक कराड या चार आरोपींचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या शोधासाठी सीआयडीच्या नऊ पथकांकडून देशभरात धावाधाव सुरू आहे. यामध्ये जवळपास १५० अधिकारी, कर्मचारी असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व फरार आरोपींचे पासपोर्टबाबतही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही. सीआयडीचे छत्रपती संभाजीनगरचे पाेलिस अधीक्षक सचिन पाटील हे रात्री आठ वाजताही बीड शहर ठाण्यात ठाण मांडून होते.

आरोपींचे ठसे जुळले
पोलिसांनी घटनेनंतर एक काळ्या रंगाची चारचाकी गाडी जप्त केली होती. त्यावरील ठसे आणि अटकेत असलेल्या आरोपींच्या ठशांची तपासणी केली असता ते जुळले आहेत. हा मोठा पुरावा सीआयीडीच्या हाती लागला आहे.

मारहाणीचे चार व्हिडीओही हाती लागले
पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडीओदेखील हाती लागले आहेत. तसेच त्या मोबाइलमधून कोणाला कॉल केले, याचीही माहिती पोलिसांनी घेतली. यात काही राजकीय नेत्यांना कॉल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

संध्या सोनवणे यांची दिवसभर चौकशी
राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांना रविवारी सकाळीच बीड शहर पोलिस ठाण्यात आणले होते. रात्री आठ वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरूच होती. त्यांचे जबाब घेण्यासह इतरही काही पुरावे त्यांच्याकडून मिळवले जात आहेत. सोनवणे यांचा यात काय रोल आहे, त्यांना चौकशीसाठी का बोलावले? याबाबत चर्चांना उधान आले होते.

Web Title: Massajog Sarpanch murder case; Nine CID teams investigating across the country, 4 videos of the beating recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.