मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण : कराडला पकडा, धनंजय मुंडेंना हाकला; बीडमधील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात एकमुखी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 06:36 IST2024-12-29T06:35:20+5:302024-12-29T06:36:17+5:30
३ किमी शहरातील विविध भागातून तीन किलोमीटर एवढे अंतर या विराट मोर्चाने पार केले. ५ तास सकाळी ११:३० ला मोर्चास सुरूवात झाली. त्यापुढे ५ तास मोर्चा चालला.

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण : कराडला पकडा, धनंजय मुंडेंना हाकला; बीडमधील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात एकमुखी मागणी
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक करा, आरोपींना शिक्षा होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशा एकमुखी मागण्या शनिवारी बीडमध्ये काढण्यात आलेल्या विराट मोर्चामध्ये सहभागी सर्वपक्षीय नेते व सामान्य नागरिकांनी केल्या. माेर्चात सत्ताधारी नेत्यांसह विरोधक, सर्वधर्मीय लोकांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला. आरोपींना अटक झाली नाही, तर हे आंदोलनाचे लोण राज्यभर पसरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला १९ दिवस उलटूनही यातील आरोपींना अटक झालेली नाही. सर्व फरार आरोपींना अटक करावी, त्यामागचा मास्टर माइंड शोधून त्यास फाशीची शिक्षा द्यावी, धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, वाल्मीक कराडला हत्येचा कट रचला म्हणून आरोपी करून अटक करावी, आदी मागण्यांसाठी हा मूक मोर्चा निघाला. कुटुंबीयांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांच्यासह हजाराे नागरिक सहभागी झाले हाेते.
वडील आता दिसतील का?
जसे काल आभाळ आले होते, हा सूर्य झाकला होता. आज ऊन पडले तर तो सूर्य पून्हा दिसतो. पण, मातीआड गेलेले माझे बाबा मला पुन्हा दिसणार का? असा सवाल उपस्थित करत, अशी वेळ कोणावरही येऊ नये. सर्वांनी खांद्याला खांदा लावून सोबत राहावे, असे आवाहन संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने केले.
माझ्या वडिलांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. ते समाजसेवक होते. एका मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना त्यांना मारहाण झाली. पण हा अन्याय पुन्हा होऊ नये, यासाठी माझ्यासोबत रहा, असे वैभवी देशमुख म्हणाली, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले.
कोण काय म्हणाले?
- आमदार सुरेश धस : जिल्ह्यात शस्त्र परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही या प्रकरणात चौकशी व्हावी. या सर्व घटनांमागे आका आहे.
- खासदार बजरंग सोनवणे : हत्या प्रकरणात वाल्मीकचे नाव सामील करा. २ जानेवारीपर्यंत तपास लागला नाही तर बीडपासून ते दिल्लीपर्यंत कोठेही उपोषण करू.
- आमदार जितेंद्र आव्हाड : आरोपींची नार्को टेस्ट करा, सत्य समोर येईल. आकाचा बाप कोण आहे, हे माहिती असताना मंत्रिमंडळात कशाला?
- माजी खासदार संभाजीराजे छत्रपती : बीडचे बिहार होऊ द्यायचे नसेल तर रस्त्यावर उतरावे लागेल. आता या मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकला.
- मनोज जरांगे-पाटील : समाजाच्या बाजूने बोलणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहा. आरोपींना अटक झाली नाही तर प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करा.
कुठून आले माेर्चेकरी?
मोर्चात बीडसह परभणी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड व अनेक जिल्ह्यांतून लोक, राजकीय नेते सहभागी झाले होते. सर्वांनीच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. मोर्चात ग्रामस्थांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पोलिसांचा
तगडा बंदोबस्त तैनात होता.
प्रशासनाला निवेदन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा माळीवेस, सुभाष रोडवरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकला. याठिकाणी नेत्यांसह देशमुख कुटूंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर प्रशासनाला निवेदन दिले.