मस्साजोगमध्ये चोरांचा धुमाकूळ; एकाच रात्री ठिकाणी ६ घरफोडी, दागिने-रोकडसह केबल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 20:02 IST2026-04-10T20:01:51+5:302026-04-10T20:02:23+5:30
पोलीस अधीक्षक आणि श्वान पथक घटनास्थळी; पण ग्रामपंचायतीचे १८ कॅमेरे बंद असल्याने चोरांचा मार्ग मोकळा.

मस्साजोगमध्ये चोरांचा धुमाकूळ; एकाच रात्री ठिकाणी ६ घरफोडी, दागिने-रोकडसह केबल लंपास
केज (बीड): तालुक्यातील मस्साजोग येथे गुरुवारी (९ एप्रिल) रात्री चोरट्यांनी हैदोस घालत एकाच रात्री सहा घरांची कुलपे फोडली. या घरफोडीत २५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ८५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, चोरट्यांनी गावातील तलावावरील ४० शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारींच्या तांब्याच्या केबलवरही डल्ला मारला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कुठे कुठे झाली चोरी?
घरफोडीची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. चोरट्यांनी अच्युत देशमुख यांच्या घरातून १० ग्रॅम सोने व ३० हजार रोख, प्रवीण देशमुख यांच्याकडून ४० हजार रोख, तर भागवत सोळुंके यांच्या घरातून १५ ग्रॅम सोने व २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. याशिवाय धनंजय देशमुख, नितीन देशमुख आणि बाळासाहेब देशमुख यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला, मात्र घरातील लोक जागे झाल्याने चोरटे पसार झाले.
प्रशासनाचा बेजबाबदारपणा: कॅमेरे फक्त नावाचेच!
तपासादरम्यान एक गंभीर बाब समोर आली आहे. गावात सुरक्षेसाठी डिसेंबर २०२५ मध्ये १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय गव्हाणे यांनी हे सर्व कॅमेरे सध्या बंद असल्याची कबुली दिली. "कॅमेरे सुरू असते तर चोरांचा माग काढणे सोपे झाले असते," अशी खंत पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने यांनी व्यक्त केली आहे.