कडा (जि. बीड) : आपल्या मुलीसोबत प्रेमसंंबंध असल्याच्या संशयावरून ट्रकचालक तरुणास पत्र्याच्या शेडमध्ये डांबून बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली. आष्टी पोलिस ठाण्यात दहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
विकास अण्णा बनसोडे (२३, रा. बोरगाव, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे तीन वर्षांपासून विकास ट्रकचालक होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढले होते. विकास हा पिंपरी गावात मित्रासह दोन दिवसांपूर्वी आला होता. याचदरम्यान विकास व भाऊसाहेब यांच्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून दोरी व वायरच्या साहाय्याने विकासला बेदम मारहाण केली. त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात मृताचा भाऊ आकाश अण्णा बनसोडे याच्या फिर्यादीवरून दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
आरोपींचे पलायन मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचे कळताच दोघाजणांनी चारचाकी वाहनातून मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून ठेवला आणि निघून गेले. कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवायचा प्रयत्न केला; पण वाहनचालक न थांबता निघून गेला.
तीन आरोपींना अटकगुन्हा दाखल होताच पोलिसांनी भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर यांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विकासच्या फोनवरून आई, वडिलांना फोनमुलाला दोन दिवस बेदम मारहाण करत असताना मृताच्या फोनवरून त्याच्या आई-वडिलांना फोन करून लवकर या इथं, आल्यानंतर सांगतो काय झालं ते, असे मोबाइलवरून संभाषण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपींमध्ये दहा जणांचा समावेश भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, बाबासाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भानुदास क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर (रा. पिंपरी घुमरी), संभाजी झांबरे, सचिन भवर, भाऊसाहेब क्षीरसागर, सुशांत शिंदे, बापूराव शिंदे.