विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू; माहेरच्यांनी रोखले शवविच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 19:19 IST2019-03-20T19:19:12+5:302019-03-20T19:19:57+5:30
सासरच्या मंडळींनी विहिरीत ढकलून मारल्याचा आरोप माहेरच्यांनी तिचे शवविच्छेदन रोखून धरले होते.

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू; माहेरच्यांनी रोखले शवविच्छेदन
अंबाजोगाई (बीड ) : जनावरांना पिण्यासाठी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रियंका प्रदीप लुंगारे असे मृत महिलेचे नाव असून ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथे मंगळवारी दुपारी घडली.
प्रियंका प्रदीप लुंगारे (वय २१, रा. कोद्री, ता. अंबाजोगाई) असे त्या विवाहितेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ३.४५ वाजता जनावरांना पाणी देण्यासाठी शेतात गेली होती. स्वतःच्या शेतातील विहिरीतून पाणी शेंदत असताना तोल गेल्याने ती विहिरीत पडली. विहिरीत भरपूर पाणी असल्याने बुडून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस जमादार अभंग यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला. प्रियंकाचे लग्न तीन वर्षापूर्वी प्रदीपसोबत झाले होते. त्यांना दिड वर्षाची एक मुलगी आहे.
नातेवाईकांनी रोखले होते शवविच्छेदन
दरम्यान, प्रियंका तोल जाऊन पडली नसून तिला सासरच्या मंडळींनी विहिरीत ढकलून मारल्याचा आरोप करत शवविच्छेदन रोखून धरले होते. यामुळे स्वारातीच्या न्यायवैद्यक विभागाच्या परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. परंतु, पोलिसांनी प्रियंकाच्या नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.