पॉझिटिव्ह निघालेले अनेक रुग्ण गेले पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST2021-03-17T04:34:19+5:302021-03-17T04:34:19+5:30

माजलगाव : शहरातील गणपती मंदिर व सोळंके महाविद्यालयात मागील चार दिवसांपासून अँटिजन चाचणी सुरू असून, यात पॉझिटिव्ह निघालेले अनेक ...

Many patients who tested positive ran away | पॉझिटिव्ह निघालेले अनेक रुग्ण गेले पळून

पॉझिटिव्ह निघालेले अनेक रुग्ण गेले पळून

माजलगाव : शहरातील गणपती मंदिर व सोळंके महाविद्यालयात मागील चार दिवसांपासून अँटिजन चाचणी सुरू असून, यात पॉझिटिव्ह निघालेले अनेक जण कोणालाही न सांगता, मंगळवारी पळून गेलेले असताना आरोग्य विभागाला मात्र याचा थांगपत्ताही लागला नाही.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, प्रशासनाने व्यापाऱ्यांना अँटिजन चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मागील चार दिवसांपासून अँटिजन चाचणीसाठी दोन ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले. यात अनेक जण पॉझिटिव्ह निघाले. मंगळवारी गणपती मंदिरात चाचणीनंतर पॉझिटिव्ह आलेले अनेक रुग्ण कोणालाही न सांगता फोनवर बोलत-बोलत येथून निघून गेले. निघून जाताना त्यांना आरोग्य विभागाचे कर्मचारी व अनेक व्यापाऱ्यांनी पाहिले. मात्र, त्या रुग्णांना कोणी अडविण्याचा प्रयत्न केला नाही. हे पॉझिटिव्ह रुग्ण दुचाकीवरून निघून गेले. पॉझिटिव्ह आलेले अनेक रुग्ण या ठिकाणावरून निघून गेले. दिवसभर भर रस्त्यावर ते फिरताना दिसून आले. याचा आरोग्य विभागाला थांगपत्ताही लागला नाही. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेल्याने व ते भररस्त्यावर फिरत असल्याने संपर्कातून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.

मागील तीन दिवसांत १,६८० व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली. यात ८७ व्यापारी पॉझिटिव्ह आले होते. बुधवारी व्यापाऱ्यांच्या अँटिजन चाचणीचा शेवटचा दिवस असल्याची माहिती डॉ. मधुकर घुबडे यांनी दिली.

जे पॉझिटिव्ह रुग्ण निघून गेले असतील, त्याबाबत व्यापारी संघास कळविले आहे. त्यांना त्या रुग्णास परत पाठविण्याबाबत सांगितले आहे. तो रुग्ण परत न आल्यास पोलिसांना सांगून आणण्यात येईल.

-- डॉ.मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी, माजलगाव

Web Title: Many patients who tested positive ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.