'मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेताहेत'; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:56 IST2025-02-25T15:52:47+5:302025-02-25T15:56:00+5:30
मस्साजोगच्या ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.

'मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेताहेत'; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने लोटले आहेत. आतापर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी पकडले नाही, जे ९ जण अटक आहेत, ते स्वतःहून हजर झालेले आहेत. आतापर्यंत १५० पेक्षा जास्त नावे सहआरोपी करण्यासाठी दिली गेली, पण काहीच झाले नाही. मुख्यमंत्री दुसऱ्यांदा संतोष देशमुख यांचा बळी घेत आहेत, असे गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "ही वेळ यायलाच नको होती. पण, आता जी वेळ यायला नको होती, ती आलेली आहे. दुर्दैव आहे. गावाला आज न्याय मागावा लागतोय आणि सत्ताधारी फक्त तपास सुरू आहे इतकंच सांगतात."
मनोज जरांगेंनी व्यक्त केली खंत
"पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बघितलं, तर आहे तेच आरोप आहेत. सगळ्या राज्याला दिसत आहे. नावं सांगितली जातात, पुरावे दिले जातात. पण त्यानंतर प्रक्रिया का होत नाही, ते कळत नाही. कुटुंबांवर ही दुर्दैवी वेळ आहे", अशी खंत मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.
"सहआरोपी करण्याची मागणी केली गेली आहे. शंभर-दीडशे नावे आहेत. खंडणी, मारहाण आणि भ्रष्टाचारात असणारे. काही पोलीस आहेत. एक माणूस अटक करायला, पुरावा सापडल्यानंतर ती गोष्ट करायला लावण्यासाठी प्रत्येक वेळी आंदोलन करावं लागतं. मग, सरकारने तीन महिन्यात नेमकं काय केलं?", असा सवाल मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला केला आहे.
पकडण्यात आलेल्या एका तरी आरोपीचं नाव सांगा -जरांगे
"ही क्रूर हत्या झालेली आहे. सरकार म्हणतंय की एकालाही सोडलं जाणार नाही. पण, आतापर्यंत धरलंय कोणाला? एखादं नाव तरी आम्हाला सांगा. हे ९ जण तुम्ही धरलेले नाहीत. हे स्वतःहून आलेले आहेत. तु्म्ही आरोपी केलेले नाही. जनतेने आंदोलन केल्यामुळे त्यांची अटक झालेली आहे", असा मुद्दा मांडत जरांगेंनी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जरांगेंकडून सुरेश धसांच्या भूमिकेवर शंका
"तीन महिन्यात एकही सहआरोपी होत नाही. मग सरकारला या प्रकरणाचं नेमकं काय करायचं आहे? हा शोधाचा विषय झालेला आहे. नाव सांगणारे तुम्ही, पुरावे देणारे तु्म्ही, सरकार तुम्ही आणि तुम्ही आतापर्यंत केलं काय? साधं तुम्हाला आतापर्यंत उज्ज्वल निकम देता आले नाहीत. किरकोळ विषय आहे. मागणी करणारे तुम्ही, मस्साजोगच्या गावकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणारे तुम्हीच आणि होऊ न देणारे पण तुम्हीच", असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी धस यांच्यावर नाव न घेता केला.
"तीन महिन्यांपासून सुरू आहे, पण यात आजपर्यंत झालंय काय? तुम्ही सरकार असून, कुटुंबाला उपोषणाला बसायची वेळ आलीये. प्रत्येक वेळी गोड बोलून तुम्ही देशमुख कुटुंबाला वेठीस धरू शकत नाही. सरकार इथं येत आणि तरीही त्यांना उपोषणाची वेळ आलीये. महायुती असो किंवा महाविकास आघाडी यात देशमुख कुटुंबाचा बळी नका घेऊन आणि मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेत आहेत", असे गंभीर विधान मनोज जरांगे यांनी केले.