महादेव मुंडेंच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मनोज जरांगे मैदानात; बीडमध्ये १ ऑगस्ट रोजी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:45 IST2025-07-29T12:36:25+5:302025-07-29T12:45:02+5:30
बीड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वधर्मीय व सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

महादेव मुंडेंच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मनोज जरांगे मैदानात; बीडमध्ये १ ऑगस्ट रोजी बैठक
बीड : परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्येचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा न्याय मिळवण्यासाठीचा लढा सुरूच असला तरी, अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज मैदानात उतरला आहे. यासाठी १ ऑगस्ट रोजी बीड शहरात महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभारले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून, १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बीड शहरातील कॅनॉल रोड येथील रामकृष्ण लॉन्स येथे बीड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वधर्मीय व सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि महादेव मुंडे यांचे कुटुंब उपस्थित राहणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज, बीड जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.