मांजरा धरणाच्या सिंचन व बिगर सिंचनासाठी थकबाकी वसुलीत लक्षणीय वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:34 IST2025-04-11T19:33:03+5:302025-04-11T19:34:00+5:30
मार्च अखेरपर्यंत एकूण 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांची यशस्वी वसुली करण्यात आली आहे.

मांजरा धरणाच्या सिंचन व बिगर सिंचनासाठी थकबाकी वसुलीत लक्षणीय वाढ
- मधुकर सिरसट
केज (बीड) : केज तालुक्यातील मांजरा जलाशयातून बिगर सिंचनासाठी कार्यरत असलेल्या एकूण 20 पाणी पुरवठा योजनांमधून तसेच सिंचनासाठी डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी शेतकऱ्यांकडून 3 मार्च 2025 दरम्यान एकूण 56 कोटी 47 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, मार्च अखेरपर्यंत एकूण 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांची यशस्वी वसुली करण्यात आली आहे.
63 गावांना पाणी पुरवठा
या जलाशयातून लातूर, बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांतील 20 पाणी पुरवठा योजनांद्वारे लातूर महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, अंबाजोगाई, कळंब व धारूर नगरपरिषद तसेच केज नगर पंचायत अशा एकूण 63 गावांना पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय या तीनही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी दिले जाते.
सिंचन व बिगर सिंचन वसुलीचा तपशील
मार्च अखेरपर्यंत सिंचन विभागात 1 कोटी 11 लाख 18 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. तर बिगर सिंचन वसुलीतून 6 कोटी 57 लाख 3 हजार रुपये वसूल झाले. यामध्ये मिळून एकूण वसुली 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांवर पोहोचली आहे. या वसुलीसाठी अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, सहायक अभियंता अभिजीत नितनवरे, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, शाखा अधिकारी सूरज निकम, शेखर अंधारे, अक्षय माने, शुभम गंभीरे, आशिष चव्हाण, कृष्णा येणगे, अब्दुल वाजिद आणि अनुप गिरी यांनी विशेष प्रयत्न केले.
उद्दिष्टाच्या पुढे जाऊन वसुली
लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक 1 ला सिंचन वसुलीसाठी 1 कोटी 1 हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले गेले होते, मात्र प्रत्यक्षात 1 कोटी 11 लाख 18 हजार रुपयांची म्हणजेच 110.08 टक्के वसुली झाली. तसेच बिगर सिंचनासाठीचे उद्दिष्ट 7 कोटी 42 लाख होते, परंतु प्रत्यक्षात 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांची म्हणजेच 103.53 टक्के वसुली करण्यात आली. ही उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली झाल्यामुळे कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी सर्व वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले आहे.