माजलगावात चाकूचा धाक दाखवून दोन ठिकाणी जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:44 IST2018-05-10T18:44:22+5:302018-05-10T18:44:22+5:30
शहरातील जुन्या डाकबंगला रोडवरील अनिल लिंबगांवकर व अनिल पुरबुज यांच्या घरी आज पहाटे अडीज ते तीनच्या दरम्यान चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करण्यात आली.

माजलगावात चाकूचा धाक दाखवून दोन ठिकाणी जबरी चोरी
माजलगांव (बीड ) : शहरातील जुन्या डाकबंगला रोडवरील अनिल लिंबगांवकर व अनिल पुरबुज यांच्या घरी आज पहाटे अडीज ते तीनच्या दरम्यान चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करण्यात आली. दोन्ही घटनेत मिळून जवळपास २ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
जुन्या माजलगाव भागातील जुना डाकबंगला रस्त्यावर अनिल उर्फ काशिनाथ लिंबगांवकर यांचा मोठा वाडा आहे. आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी वाड्याच्या मागील बाजूने आत प्रवेश केला. चोरट्यांनी बैठकीतील कपाट फोडून त्यातील चार ते पाच हजाराची रक्कम हस्तगत केली. यानंतर त्यांनी वरच्या मजल्यावर जात लिंबगांवकर व त्यांच्या विवाहित मुलीच्या गळ्याला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी दिली. लिंबगांवकर यांच्या मुलीच्या अंगावरील दागिने काढत त्यांनी यावेळी काढून तेथून पोबारा केला. या प्रकरणी लिंबगांवकर यांनी २ लाख ७७ हजाराच्या मुद्देमाल चोरीची तक्रार माजलगाव पोलीस स्थानकात दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजीव तळेकर हे करीत आहेत.
या घटनेच्या काही वेळापूर्वी चोरट्यांनी याच भागातील अनिल पुरबुज यांच्या घरी चोरी केली. यात त्यांनी नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असा सात ते आठ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घ्त्नासुद्धा उघडकीस आली आहे.