Maharashtra Politics: संदीप क्षीरसागरांच्या अडचणी वाढल्या; तहसीलदारांना धमकावल्याचा कॉल व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 08:54 IST2025-03-11T08:53:33+5:302025-03-11T08:54:41+5:30
Maharashtra Politics: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला आहे.

Maharashtra Politics: संदीप क्षीरसागरांच्या अडचणी वाढल्या; तहसीलदारांना धमकावल्याचा कॉल व्हायरल
Maharashtra Politics ( Marathi News ): बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड याचे नाव मुख्य आरोपीमध्ये आले. यानंतर मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये संदीप क्षीरसागर नायब तहसीलदारांना धमकी देत असल्याचं ऐकायला मिळत आहे, यामुळे आता संदीप क्षीरसागर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अनेक फुटबॉलपटू
काही दिवसापूर्वी भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याचा मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे आमदार धस यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. सुरेश धस यांनीही सतीश भोसले आपला कार्यकर्ता असल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी नायब तसहीलदारांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील नायब तहसीलदार यांना दमदाटी आणि धमकावलव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल होत असून क्षीरसागर यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये नायब तपसीलदार सुरेंद्र डोके यांना 'ग्रामरोजगार सेवकाबद्दल तक्रार करु नको',असं क्षीरसागर सांगत असल्याचे ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप २०२३ मधील आहे, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कार्यकर्त्याच्या एका कामासाठी क्षीरसागर यांनी तसहीलदार यांना फोन करुन धमकावल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हायरल कॉलमध्ये संवाद काय आहे?
नायब तहसीलदार- हॅलो साहेब, नमस्कार
संदीप क्षीरसागर- पीए सर नमस्ते भैय्या साहेब बोलणार आहेत.
नायब तहसीलदार- नमस्कार साहेब
संदीप क्षीरसागर- डोके साहेब उंब्रद खालसाच्या विषयात तुम्ही ग्राम रोजगार सेवकाला का नाटीस काढली?
नायब तहसीलदार- साहेब त्याची तक्रार आली होती
संदीप क्षीरसागर- कशाची तक्रार त्याची सही बीयी काही नाही
नायब तहसीलदार- त्यात सुनावणी घेतो आणि पुढची प्रोसेस करतो
संदीप क्षीरसागर- एक तर तुम्ही माझ्या मतदारसंघात चार्ज मला न विचारता घेतला आहे
नायब तहसीलदार- साहेब त्याच्यात तक्रार आली होती त्याची चौकशी करावी लागेल
संदीप क्षारसागर- एक तर तुम्ही चार्ज मला न विचारता घेतला आहे, तुम्हाला असं वाटत आहे सहा महिन्यात सरकार आली तर तू महाराष्ट्रात कुठेही असला तर सोडणार नाही सांगतो. तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नकोस
नायब तहसीलदार- साहेब चौकशी करतो प्रोसेसर करून घेतो ना
संदीप क्षीरसागर- तुझे नाटक मीच बघेल बर का, कुठेही गेला तरी महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाही ना तू आ, या विषयात रोजगार सेवकाला कुठेही अडचण आली नाही पाहिजे, बर का
नायब तहसीलदार- करुन घेतो, करुन घेतो
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ कॉल व्हायरल झाला आहे. यामुळे आता राजकीय वर्तळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुरेश धस यांनी लावून धरले होते. दरम्यान, आता या दोन्ही नेत्यांच्या विरोधातील व्हिडीओ, ऑडिओ क्लिप व्हायरल झाले आहेत.