परळीत महाराष्ट्र बँकेच्या शाखेस आग; मॅनेजरच्या कॅबीनसह तीनरूम जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 15:06 IST2022-10-22T15:05:54+5:302022-10-22T15:06:18+5:30
आगीत बँकेतील स्ट्रॉंगरूम सुरक्षित आहे, मात्र महत्वाची कागदपत्रे जळाली असल्याची माहिती

परळीत महाराष्ट्र बँकेच्या शाखेस आग; मॅनेजरच्या कॅबीनसह तीनरूम जळून खाक
- संजय खाकरे
परळी (बीड): शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या सुभाषचौक रोड येथील शाखेत शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत बँकेच्या व्यवस्थापकाचे कक्ष व शेजारील दोन कॅबिनमधील साहित्य जळून खाक झाले. यात बँकेचे महत्वाचे कागदपत्र ही जळून नष्ट झाल्याची माहिती आहे.
दरम्यान घटनास्थळी महाराष्ट्र राज्य निर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत केंद्र व परळी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून ही आग एक तासात नियंत्रणात आणली शनिवार सुट्टी चा वार असल्याने बँकेत अधिकारी कर्मचारी कोणी नव्हते. सकाळी पावणे दहाच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बँके कार्यालयाच्या खिडकीतून धूराचे लोट बाहेर येत असल्याचे दिसताच खालील संकुलातील व्यापारी संतोष चव्हाण, फुलझळके यांनी नगरपालिकेला याची तत्काळ माहिती दिली.
नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाचे प्रमुख सुनिल आदोडे पथकासह तातडीने बँकेजवळ पोहचले. त्यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यास पाचारण केले. तसेच माहिती मिळताच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ही तातडीने येऊन दरवाजाचे कुलूप उघडले. त्यानंतर काही वेळात अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. विद्युत केंद्राच्या सुरक्षितता विभागाचे वैजनाथ चाटे, परमेश्वर नागरगोजे, पांडुरंग काकडे, अशोक मुंडे, योगेश मंडलिक, अनिल परदेशी, फारूक व नपचे आदोडे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. थर्मलचे सुरक्षा अधिकारी एच. डी उदार यांनीही घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळास पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, सपोनि नारायण गित्ते, डीबीचे व्यंकटराव भताने यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन मदत कार्य केले.
आगीत बँकेच्या व्यवस्थापकाच्या कक्षातील कागदपत्रे जळाली आहेत. बँकेतील स्ट्रॉंगरूमला मात्र काहीही झाले नसल्याचे समजते. तसेच संगणकाचे ही नुकसान झाले आहे. अन्य दोन ठिकाणच्या कक्षाला आग लागल्याने कपाटातील कागदपत्रे जळाले आहेत. सुभाषचौक रोड येथील ही शाखा गैरसोयीचे आहे. दुसया मजल्यावर अपुऱ्या जागेत बँक असल्याने खातेदाराची नेहमी कुचंबणा होते. आगीत काय काय कागदपत्रे जळाली हे मात्र समजू शकले नाही. आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. काही वर्षात पूर्वी ही बँक शाखेस आग लागली होती,