महादेव मुंडेंचे खुनी १९ महिन्यांनंतरही मोकाट; अटकेसाठी ग्रामस्थांचा भरपावसात रास्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 15:21 IST2025-07-25T15:18:04+5:302025-07-25T15:21:12+5:30
खूनप्रकरणी आरोपींना अटक न झाल्यामुळे संताप; कन्हेरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन

महादेव मुंडेंचे खुनी १९ महिन्यांनंतरही मोकाट; अटकेसाठी ग्रामस्थांचा भरपावसात रास्तारोको
परळी : येथील व्यापारी महादेव दत्तात्रय मुंडे यांचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेस १९ महिने उलटले, तरी अद्यापही आरोपी मोकाट आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या सासर आणि माहेरच्या ग्रामस्थांनी एकत्र येत २५ जुलै रोजी परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांचे नातेवाईकही सहभागी झाले आहेत.
या आंदोलनात कन्हेरवाडी (माहेर) आणि भोपळा (सासर) येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जोरदार पावसातही आंदोलन ठामपणे सुरू ठेवत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस प्रशासनाला पूर्वसूचना देत आंदोलनाचा इशारा आधीच देण्यात आला होता. या आंदोलनात मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, विजयसिंह उर्फ बाळा बांगर, रिपाई (खरात गट) चे नेते सचिन खरात, तसेच कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत म्हटले, “महादेव मुंडे खूनप्रकरणातील आरोपींना अटक झालीच पाहिजे. वाल्मीक कराड व त्याच्या टोळीने घडवलेला हा गुन्हा आहे. सर्व प्रकरणाचा संपूर्ण पोलखोल आम्ही करणार आहोत. आम्ही मागे हटणार नाही. धनंजय देशमुख यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांना पाठिंबा दिला. या प्रकरणातील एकही आरोपी सुटू नये, सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे. ग्रामस्थांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सचिन खरात यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटले, या घटनेला जवळपास २० महिने झाले, तरीही आरोपींना अटक झालेली नाही. हे सरकार झोपेत आहे का? पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळाला पाहिजे.”
महादेव मुंडे यांच्या खुनाच्या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू असून, या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून आरोपींना तातडीने अटक करावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती.