महादेव मुंडे खून प्रकरण: मारेकरी पकडा, बीड पोलिसांना कुटुंबाकडून १० दिवसांचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:19 IST2025-02-12T12:18:30+5:302025-02-12T12:19:20+5:30

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर परळीत महादेव मुंडे खून प्रकरणही चर्चेत आले.

Mahadev Munde murder case: Catch the killer, Beed police given 10-day ultimatum by family | महादेव मुंडे खून प्रकरण: मारेकरी पकडा, बीड पोलिसांना कुटुंबाकडून १० दिवसांचा अल्टीमेटम

महादेव मुंडे खून प्रकरण: मारेकरी पकडा, बीड पोलिसांना कुटुंबाकडून १० दिवसांचा अल्टीमेटम

बीड : परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा १६ महिने उलटूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आक्रमक झाल्या आहेत. १० दिवसांत या गुन्ह्याचा छडा न लागल्यास थेट पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मंगळवारी दुपारी त्या चिमुकल्यांसह पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्या होत्या.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर परळीत महादेव मुंडे खून प्रकरणही चर्चेत आले. मुंडे यांचा खून करून मृतदेह तहसील कार्यालयाच्या आवारात फेकला होता. या घटनेला आता १६ महिने उलटत आहेत, तरीही याचा तपास लागलेला नाही. सत्ताधारी, विरोधकांनी यावर प्रश्न उपस्थित करत पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. महादेव यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर परळी पोलिसांकडून तपास काढून घेत अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्याकडे देण्यात आला. परंतु, त्यांनीही यात काहीच न केल्याचा आरोप करत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. अधीक्षक नवनीत काँवत कार्यालयात नसल्याने त्यांनी तेथेच मुलांसह ठिय्या मांडला होता. पुढील १० दिवसांत जर या गुन्ह्यांचा तपास झाला नाही, तर आपण थेट पोलिस अधीक्षक कार्यालयातच उपोषण करण्याचा इशाराही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे. त्यामुळे बीड पोलिसांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान पोलिस अधीचक कॉंवत हे मंगळवारी बैठकीसाठी परळीलाच गेल्याचे सांगण्यात आले.

एसपी बदलले, पण गुन्हेगारी थांबेना
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात अविनाश बारगळ यांची बदली करून त्यांच्या जागी पोलिस अधीक्षक म्हणून नवनीत काँवत यांची नियुक्ती केली. काँवत यांनी काही कठोर पाऊले उचलले, परंतु तरीही जिल्ह्यातील गुन्हेगारी, चोऱ्या थांबत नसल्याचे दिसत आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे भर चौकात वाहने चाळण्यासह सत्तुरने वार केल्याची घटना घडली. त्यानंतर माजलगावातही राजस्थानी स्मशानभूमीत तोडफोड करून वाहने जाळण्यात आली. चोरी, घरफोड्याही सुरूच आहेत. त्यामुळे एसपी बदलले, तरी गुन्हेगारी थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Mahadev Munde murder case: Catch the killer, Beed police given 10-day ultimatum by family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.