प्रेमविवाहाचा खेळखंडोबा; स्वत:चे दुसरीसोबत ‘अफेअर’ अन् पत्नीवरच संशय घेत मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:56 IST2025-05-17T13:53:58+5:302025-05-17T13:56:35+5:30
गेवराई तालुक्यातील प्रकार: पुण्यावरून चकलांबा ठाण्यात गुन्हा वर्ग

प्रेमविवाहाचा खेळखंडोबा; स्वत:चे दुसरीसोबत ‘अफेअर’ अन् पत्नीवरच संशय घेत मारहाण
बीड : २०१५ साली प्रेमविवाह झाला. नंतर दोन मुलेही झाली. परंतु, आता पतीने बाहेरची एक मुलगी घरात आणली. तिचे ऐकून प्रेमविवाह केलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार एप्रिल महिन्याच्या शेवटी गेवराई तालुक्यातील उमापूर येथे घडला. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, तो पुण्यावरून चकलांबा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
सोनम व सुनील (नाव बदलले) यांची ओळख पुण्यातील येरवडा येथे २०१५ साली झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर विवाहात झाले. त्यांना दोन मुलेही झाली. दोघेही गेवराई तालुक्यातील उमापूर येथे राहण्यासाठी आले. लग्नानंतर काही दिवस सुखी संसार चालल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून खटके उडू लागले. पण लव्ह मॅरेज असल्याने सोनमने घरी सांगितले नाही. सुनीलकडे तीन ट्रॅक्टर असून, तो ऊसतोडीचे ठेकेदारीचे काम करतो. बाहेरच्या राज्यातून मजूर आणून त्यांच्याकडून ऊसतोडीचे काम करून घेताे. सुनीलचे भोसरी येथील एका पूनम (नाव बदलले) नावाच्या मुलीसोबत सूत जुळले. हा प्रकार सोनमला तिच्या मामाच्या मुलाने सांगितला. जानेवारीमध्ये सोनमने सुनीलला याबाबत विचारणा केली. यावर त्यानेही पूनमसोबत प्रेमसंबंध असून, तिच्याशी लग्न करणार आहे. तू मला सपोर्ट नाही केला तर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेईन, अशी धमकी दिली. त्यानंतरही सोनमने पतीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याच्यात सुधारणा झाली नाही.
सोनमने गाठले मध्य प्रदेश
सुनील हा डिसेंबर २०२४ मध्ये मध्य प्रदेश राज्यात ऊसतोडीकरता गेला होता. त्यानंतर ३१ फेब्रुवारी २०२५ रोजी सोनमला तिच्या मामाच्या मुलाने फोन करून सुनील हा पूनमसोबत विवाह करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सोनमने मध्य प्रदेश गाठत सर्वांनाच तेथून उमापूरला आणले. पूनमलाही त्याच घरात ठेवले. २७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पूनमने सुनीलचे कान भरले. सोनमचे पुण्यातील एका व्यक्तीसोबत अफेअर असल्याचे सांगितले. यावर सुनीलने कसलीही खात्री न करता सोनमला स्टीलच्या राॅडने पाठीवर, उजव्या हाताच्या दंडावर, उजव्या पायाच्या घोट्यावर मारहाण केली. तसेच मंगळसूत्र, कानातले बुगडे व इतर स्त्रीधन काढून घेतले. त्यानंतर सोनम गेवराईहून पुण्याला आईकडे निघून गेली. तेथील पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा चकलांबा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.