पाऊस भरपूर, निम्मे प्रकल्प अद्याप तहानलेलेच; बिंदुसरा मात्र तुडुंब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:14 IST2019-11-02T00:13:54+5:302019-11-02T00:14:40+5:30
जिल्ह्यात यंदा १ जूनपासून ३१ आॅक्टोबरपर्यंत ६३५. ३ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९५.३४ टक्के इतके आहे.

पाऊस भरपूर, निम्मे प्रकल्प अद्याप तहानलेलेच; बिंदुसरा मात्र तुडुंब !
बीड : जिल्ह्यात यंदा १ जूनपासून ३१ आॅक्टोबरपर्यंत ६३५. ३ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९५.३४ टक्के इतके आहे. आणखी दोन तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. पाऊस मुबलक झालेला असताना मात्र जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांपैकी ६४ प्रकल्पांची तहान किंचितही भागलेली नाही. ३२ प्रकल्प जोत्याखाली तर ३२ प्रकल्प कोरडे आहेत. एकीकडे ओल्या दुष्काळी परिस्थिती असताना प्रकल्पांतील जलसाठ्याबाबत समृद्धी दूरच आहे.
बीड जिल्ह्यात जूनमध्ये ७०.२० मिमी पाऊस झाला. जुलैमध्ये हे प्रमाण ६८.५० मिमी, आॅगस्टमध्ये ६३.३० तर सप्टेंबरमध्ये १७२.२० मिमी पाऊस झाला. चार महिन्यात कमी पडलेल्या पावसाने आॅक्टोबरमध्ये कसर भरुन काढली. या महिन्यात तब्बल २६१ मिमी पाऊस झाला. पाच महिन्यात ६३५.३ मिमी पाऊस एकूण पाऊस झाला. हे प्रमाण ९५.३३ मिमी इतके आहे. त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. परंतू पडलेल्या पावसाच्या तुलनेत प्रकल्पांमधील जलसाठा कमीच आहे.
जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु असे १४४ प्रकल्प आहेत. १२६ लघु प्रकल्पांपैकी ३४ प्रकल्पातच १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ७५ टक्क्यांपर्यंत ४ प्रकल्प भरलेले आहेत. १२ तलावांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. ८ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. २८ जोत्याखाली, २७ प्रकल्प कोरडे आहेत. १६ मध्यम प्रकल्पांपैकी एकच प्रकल्प १०० टक्के भरला आहे. ७५ टक्के पाणी एका प्रकल्पात आहे. ५० ते ५५ टक्के पाणीसाठा एका प्रकल्पात आहे. दोन प्रकल्पात २५ ते ५० टक्के तर ३ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ३ प्रकल्प जोत्याखाली तर ५ प्रकल्प कोरडे आहेत.
‘मांजरा’ जोत्याखालीच
मोठा प्रकल्प असलेला मांजरा अद्यापही जोत्याखाली आहे. तर माजलगाव प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा आहे. माजलगाव आणि बिंदुसरा प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त मिटल्यात जमा आहे.
एकूण प्रकल्प १४४
१०० टक्के ३५
०७५ टक्के ०५
५० ते ७५ टक्के १४
२५ ते ५० टक्के १०
२५ टक्क्यांपेक्षा कमी १६
जोत्याखाली ३२
कोरडे ३२