माजलगाव आगाराच्या खराब बसमुळे प्रवाशांची एसटीला पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:00 IST2017-12-25T17:58:52+5:302017-12-25T18:00:42+5:30
आगाराअंतर्गत असणार्या अनेक बस खटारा झाल्यामुळे झाल्यामुळे प्रवासी या आगारातून सुटणार्या बस गाड्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

माजलगाव आगाराच्या खराब बसमुळे प्रवाशांची एसटीला पाठ
माजलगाव (बीड) : आगाराअंतर्गत असणार्या अनेक बस खटारा झाल्यामुळे झाल्यामुळे प्रवासी या आगारातून सुटणार्या बस गाड्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. यातून अवैध वाहतुकीला चांगलेच प्रोत्साहन मिळत आहे. स्थानिक व्यवस्थापन आणि वरिष्ठांच्या दुर्लक्षतेमुळे माजलगाव आगाराचे नुकसान होत आहे.
माजलगाव बस आगार हे नेहमी या-ना त्या कारणावरून चर्चेत असते. सध्या आगारात असणार्या ५९ बस पैकी ६ बस खराब झालेल्या आहेत. तर ६ बस या दुरुस्तीसाठी गेलेल्या आहेत. तसेच दोन बसच्या काचा या खराब रस्त्यामुळे निखळून पडल्यामुळे त्या बस सोडता येत नाहीत. आगारातील एकूण ५९ बसपैकी १४ बस या निकामी असल्यामुळे येथील आगार प्रमुखांची मोठी पंचाईत झाली आहे.
आगार प्रमुखांना उपलब्ध असलेल्या बसेसच्या आधारे व्यवस्थापन सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आगारातील बसेस वेळेवर सोडण्यासाठी देखील मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातही ज्या बसेस चालू आहेत त्यांची अवस्था देखील काही व्यवस्थित नाही.
नेहमी या-ना त्या कारणावरून या बसेस ‘फेल’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा वैताग होताना पहावयास मिळत असून बसेसच्या या अवस्थेमुळे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळताना पाहावयास मिळत आहेत. प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवल्यामुळे अवैध वाहतूकदारांचे उखळ पांढरे होत आहे. बीड विभागात चांगले उत्पन्न मिळवून देणारे माजलगाव आगार मागील काही महिन्यांंपासून खराब बसमुळे चर्चेत असून प्रवाशांच्या पाठ फिरवणीमुळे सर्वसामान्यांच्या एसटीचा प्रवास तोट्याकडे जाताना दिसत आहे.
थंडीमुळे प्रवासी काकडू लागले
सध्या हिवाळ्याचे दिवस असून थंडी देखील मोठ्या प्रमाणावर पडलेली आहे. माजलगाव आगारातील अनेक गाड्यांचे काच निखळलेले असल्यामुळे सकाळच्या वेळी प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. थंडीने काकडून जाण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळच्यावेळी प्रवासी बसने प्रवास करण्यास टाळाटाळ करीत आहेत. जे प्रवासी मजबुरीने प्रवास करीत आहेत, ते मात्र काकडून गेल्याचे पहावयास मिळत आहे.
रस्ता खराब असल्याने दयनीय स्थिती
माजलगाव तालुक्यातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने गाड्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्ते दुरूस्त करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकर्यांना अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही काही उपयोग होत नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करण्याची वेळ आली आहे.
- एस. पी. डोके, आगार प्रमुख, माजलगाव