भर दुपारी बिबट्याचे दर्शन! धानोरा, नांदूर विठ्ठलाचे परिसरातील शेतकरी भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 16:30 IST2024-03-06T16:30:30+5:302024-03-06T16:30:47+5:30
परिसरात अनेक वेळा बिबट्या आढळून देखील वनविभागाकडून कसलीच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.

भर दुपारी बिबट्याचे दर्शन! धानोरा, नांदूर विठ्ठलाचे परिसरातील शेतकरी भयभीत
- नितीन कांबळे
कडा: भर दिवसा शेतात बिबट्या आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.तर अनेक वेळा बिबट्या आढळून देखील वनविभागाकडून कसलीच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. पाहणीचा देखावा करणारा वनविभाग नेमका करतोय काय? असा प्रश्न गावांतून उपस्थित केला जात आहे. भर दिवसा बिबट्याने धानोराकरांना दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील गायकवाड मळा या शेतात बुधवारी भर दुपारी बिबट्या आढळून आला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. दोन दिवसांपूर्वी नांदूर विठ्ठलाचे येथे एक बिबट्या आढळून आला होता. हा बिबट्या तोच असल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी कॅमेर्यात कैद झालेला बिबट्या
नांदूर विठ्ठलाचे या परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या आढळून आला होता. काही तरुणांनी कॅमेर्यात त्याचे चित्रीकरण केले. दरम्यान, नांदूर विठ्ठलाचे, धानोरा परिसरात बिबट्या आढळून आला आहे. शेत कामे करताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनरक्षक बी.के.विधाते यांनी केले आहे.