खळबळजनक! रोजगारासाठी गाव सोडले, पुण्यात येताच बीडच्या तरुणाची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:17 IST2025-01-21T15:11:56+5:302025-01-21T15:17:05+5:30
बीडच्या तरुणाची पुण्यात निर्घृण हत्या; डोक्यावर गंभीर जखम असून संपूर्ण शरीरावर देखील मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत.

खळबळजनक! रोजगारासाठी गाव सोडले, पुण्यात येताच बीडच्या तरुणाची निर्घृण हत्या
दिंद्रुड (बीड): माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथून रोजगाराच्या शोधात पुण्यात आलेल्या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. बाळासाहेब (बालाजी) मंचक लांडे (२३) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी ( दि. १७) पिंपरी चिंचवड भागातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गंभीर जखमी अवस्थेत लांडे यास दाखल करून दोघांनी पळ काढल्याची माहिती आहे.
अधिक वृत्त असे की, बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील बाळासाहेब (बालाजी) मंचक लांडे (वय २३ वर्ष)हा रोजगाराच्या शोधात पुण्याला जात असल्याचे आईला सांगून १६ जानेवारीस निघाला होता. १७ जानेवारीच्या दुपारपासून त्याचा मोबाईल बंद होऊन तो बेपत्ता झाला. यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, त्याच रात्री पिंपरी चिंचवड भागातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलला गंभीर जखमी अवस्थेतील बाळासाहेब यास उपचारासाठी दोघांनी दाखल करून पळ काढला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
संपूर्ण शरीरावर जखमा
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंद करून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले. बाळासाहेब याच्या संपूर्ण अंगावर, डोक्यावर मारहाणीच्या गंभीर जखमा आढळून आल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला. संत तुकारामनगर पोलीस ठाणे आणि सिटी क्राईम ब्रॅंचने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत बाळासाहेब यास रुग्णालयात दाखल करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. सोमवारी त्या दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती असून अधिक तपास सुरु आहे.
ऑनलाइन तक्रारीवरून लागला शोध
बाळासाहेब (बालाजी) लांडे शुक्रवारपासून बेपत्ता होता. त्याचा चुलत भाऊ परशुराम विलास लांडे हा पुण्यात त्याचा शोध घेत होता. दरम्यान, त्याने सोमवारी पोलिसांच्या पोर्टलवर ऑनलाईन मिसिंगची तक्रार दाखल केली. तासाभरात परशूराम यास पिंपरी चिंचवड क्राईम ब्रॅंचने संपर्क साधला. यशवंतराव चव्हाण मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटल येथे परभुराम यास बोलावून घेऊन मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.