मागील वेळी पालकमंत्री, मंत्रीपद भाड्याने दिले; सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:55 IST2024-12-25T17:54:58+5:302024-12-25T17:55:38+5:30

धनंजय मुंडे हे पाच वर्षांत वेगळे वागायला लागले आहेत. ‘काय होतास तू अन् काय झालास तू’ असे म्हणत आ. धस यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.

Last time, the Guardian Minister and Ministerial post were rented out; Suresh Dhas targets Dhananjay Mude | मागील वेळी पालकमंत्री, मंत्रीपद भाड्याने दिले; सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

मागील वेळी पालकमंत्री, मंत्रीपद भाड्याने दिले; सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

बीड : मागील पालकमंत्री आणि मंत्रीपद भाड्याने देण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आ. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केला. मंत्रीपद भाड्याने दिल्याचे मी नव्हे, तर पंकजा मुंडे यांनीच तेव्हा भगवान भक्ती गडावरून असे भाष्य केले होते. मी तर आता म्हणलो आहे, असे म्हणत पंकजा यांच्या वक्तव्याचीही आठवण करून दिली.

केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजले. याचे पडसाद अधिवेशनात उमटले. भाजपचे आ. सुरेश धस यांनी अंगावर शहारे आणणारा सर्व घटनाक्रम सांगितला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी दोन चौकशांचे आदेश दिले होते. अधिवेशन संपल्यानंतर धस आष्टीत आले. त्यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.

विष्णू चाटे हा छोटा आका होता; परंतु मोठा आका याचादेखील हत्या प्रकरणात सहभाग आहे. तोच मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळे त्यालादेखील आत लवकर आत टाकले पाहिजे. २०० पेक्षा जास्त कुटुंबे, व्यापारी हे गाव सोडून गेले आहेत. गायछाप, तंबाखू, चुन्याची एजन्सीही बळकावली. आता कोणाकडेही एजन्सी राहिली नाही, असे म्हणत परळीची अवस्था बिकट झाल्याचे आ. धस म्हणाले. परळीतील दुबे अपहरण प्रकरणातही आका असून, ते किती लाख रुपयांत मिटले हे मला माहिती आहे. ते लोक आपल्याला भेटायला येणार असल्याचेही आ. धस यांनी सांगितले.

‘काय होतास तू अन् काय झालास तू’
धनंजय मुंडे हे पाच वर्षांत वेगळे वागायला लागले आहेत. ‘काय होतास तू अन् काय झालास तू’ असे म्हणत आ. धस यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. तुमच्या भरपूर चर्चा कानावर येत आहेत. ती माय माउली बीडमध्येच राहत असून रोज ओरडत आहे, असे म्हणत करुणा शर्मा यांचे नाव न घेता आ. धस यांनी आपल्याला सर्व माहिती असल्याचा इशारा दिला.

धसांनी कॉलर उडवली
मस्साजोग हे मराठा समाजाचे गाव आहे; परंतु लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे तेथून जात असताना याच संतोष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. विधानसभेत तो भाजपचा बुथ प्रमुख होता. तो माझ्या पक्षाचा आहे म्हणून मी यात पडलो, असे म्हणत आ. धस यांनी कॉलर उडवत आपण कोणाला घाबरत नसल्याचेही सांगितले. धनंजय मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरून केलेल्या ‘असे प्रकार काय बीडमध्येच घडतात का’, या वक्तव्यावर धस यांनी आक्षेप नोंदविला. तुम्ही अप्रत्यक्ष याचे समर्थनच करत असल्याचे म्हणत मुंडेंवर निशाणा साधला.

Web Title: Last time, the Guardian Minister and Ministerial post were rented out; Suresh Dhas targets Dhananjay Mude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.