डोक्यावरील जखम व्यवस्थित स्वच्छ न झाल्याने पडल्या अळ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:29 IST2019-11-20T00:29:25+5:302019-11-20T00:29:57+5:30
झाडावरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली. ती जखम व्यवस्थित स्वच्छ न केल्याने आणि पट्टी बदलायला १२ तास उशिर झाल्याने इनफेक्शन होऊन त्या जखमेवर बारीक अळ्या झाल्याचे समोर आले आहे.

डोक्यावरील जखम व्यवस्थित स्वच्छ न झाल्याने पडल्या अळ्या !
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : झाडावरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली. ती जखम व्यवस्थित स्वच्छ न केल्याने आणि पट्टी बदलायला १२ तास उशिर झाल्याने इनफेक्शन होऊन त्या जखमेवर बारीक अळ्या झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक पाच मध्ये हा प्रकार सोमवारी उघडकीस आला होता. या प्रकरणातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.
ज्ञानदेव निवृत्ती वीर (५५ रा.पाली जि.बीड) हे शेळीला पाला काढण्यासाठी झाडावर चढले होते. याचवेळी त्यांचा तोल गेल्याने खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. ही घटना शुक्रवारी घडली होती. त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी डोक्याला जखमेच्या ठिकाणी सात टाके घेऊन वॉर्ड क्रमांक पाच मध्ये शरीक केले.
या जखमेची पट्टी रविवारी सायंकाळपर्यंत बदलने आवश्यक होते. परंतु कर्मचारी सुट्टीवर असल्याने पट्टी करायला १२ तास उशीर झाला. सोमवारी पट्टी करताना त्यात बारीक आळ्या झाल्याचे दिसले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जखम व्यवस्थीत स्वच्छ झालेली नसावी. तसेच जखमेवर माशा बसल्या. यामुळे इन्फेक्शन होऊन त्यात अळ्या झाल्या असाव्यात. असा प्रकार आतापर्यंत प्रथमच घडल्याचेह तज्ज्ञांनी सांगितले.
दरम्यान, हा प्रकार समजताच मंगळवारी सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी संबंधित रूग्णाची भेट घेतली. त्याची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही पट्टी बदलायला उशिर का झाला? डॉक्टर, कर्मचारी यात दोषी आहेत का, याबाबत चौकशी केली जाणार असल्याचेही डॉ. अशोक थोरात यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.