"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 21:09 IST2025-10-28T21:07:07+5:302025-10-28T21:09:29+5:30
Prakash Solanke Statement: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीत दारू, बोकडं कापावी लागतील, दारूगोळा तयार ठेवा असे सांगत अप्रत्यक्षपणे पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा असे विधान केले.

"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
Prakash Solanke News: दिवाळी संपताच राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रत्येक पक्षाकडून स्थानिक नेते, इच्छुक उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश दिले जात आहे. अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीत खर्च करण्याची तयारी ठेवा अशा आशयाचे विधान केले आहे. 'नुसती निवडणूक लढवायची इच्छा असून उपयोग नाही. तुमच्याकडे किती 'दारू'गोळा आहे, याची माहिती आम्हाला द्या', असे प्रकाश सोळंके म्हणाले.
माजलगाव येथे २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ता बैठक झाली. या बैठकीत बोलताना प्रकाश सोळंके यांनी हे विधान केले. त्यांच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कुणाला लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी
आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, "माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कसे मतदान घेतले हे त्यांना चांगले माहिती आहे. ते एक्सपर्ट झाले आहेत. शेवटच्या दोन दिवसात कुणाला चपटी द्यावी लागते. कुणाला कोंबडं कापावं लागतं आणि कुणासाठी बकरु कापावं लागतं. कुणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं. पण, यात तुम्ही एक्सपोर्ट बनलेले आहात."
नुसती निवडणूक लढवण्याची इच्छा असून उपयोग नाही
"माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवल्या आहेत. आपण घेतलेल्या अनुभवाचा वापर या निवडणुकीमध्ये करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांच्याकडे काय दारूगोळा उपलब्ध आहे, याची माहिती सुद्धा आम्हाला द्यावी लागणार आहे. निवडणूक लढवण्याची नुसती इच्छा असून उपयोग नाही, तर बंदुकीतून गोळ्या झाडाव्या लागतात", असे आमदार प्रकाश सोळंके कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हणाले.
"लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपण त्यांची अपेक्षापूर्ती करू शकत नाही. मात्र, कुठेही कमी पडता कामा नये. समोरचा माणूस निवडणुकीत जर १०० रुपये खर्च करणार असेल, तर आपलीही १०० रुपये खर्च करण्याची तयारी असावी. आजपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहिला आहात. विधानसभेपेक्षा चारपट अधिक वेगाने काम करावं लागणार आहे. चारपट अधिक कष्ट करावे लागतील", अशा सूचना आमदार प्रकाश सोळंके यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.