कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता
By Admin | Updated: October 25, 2014 23:49 IST2014-10-25T23:11:01+5:302014-10-25T23:49:28+5:30
बीड : जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी तब्बल ६० टक्के क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाच्या पिकाचे पावसाने ताण दिल्यामुळे तब्बल ३० ते ४० टक्याच्या पुढे उत्पादनात घट येण्याची

कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता
बीड : जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी तब्बल ६० टक्के क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाच्या पिकाचे पावसाने ताण दिल्यामुळे तब्बल ३० ते ४० टक्याच्या पुढे उत्पादनात घट येण्याची शक्यता शेती तज्ज्ञातून व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे़ अवेळी पावसाचा फटका सोयाबीनलाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे़
बीड जिल्ह्यातील एकुण वहिती जमिनीपैकी ८२ टक्के जमीन कोरडवाहू आहे़ त्यातच यंदा अवेळी पडलेला पाऊस आणि कमी प्रमाण यामुळे ६० टक्के क्षेत्रावर लागवड केलेल्या कपासीची मोठी वाताहात झाली आहे़ हंगामाच्या सुरूवातीला पावसाने आखडता हात घेतल्याने कपाशीची वाढ जोमाने झाली नाही़ त्यातच बोंडे भरण्याच्या काळात पावसाने ताण दिल्याने एका कपाशीच्या झाडाला सात ते आठ बोंडाच्यावर फळ धारणा झालेली नाही़
त्यातच रस शोषणारे किड, मिलीबग याचा मोठा प्रादुर्भाव कपाशीवर झाल्याने शेतकऱ्यांना किडरोग व्यवस्थापनासाठी अतिरीक्त खर्च करायची वेळी आली आहे़ पाच पाच फवारण्या करूनही कपाशीची वाढ म्हणावी तशी झाली नाही़, असे उदंड वडगावचे शेतकरी कैलास चव्हाण यांनी सांगितले़ सोयाबीन या पिकाचीही मोठी वाताहात झाली आहे़ अवेळी पडलेल्या पावसाने सोयाबीनची सुरूवातीला जोमाने वाढ झाली, परंतू फळधारणा होण्याच्या काळात पाणी कमी पडल्याने फुलगळती झाली़ त्यामुळे सोयाबीन उत्पादकांनाही मोठा फटका बसणार आहे़ कापसाचे उत्पादन सरासरी एकरी दोन ते तीन क्विंटलच्या पुढे जाणार नाही, असा अंदाज शेतीतज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केला़
सोयाबीनचे उत्पादनही घटून एक ते तीन क्विंटलच्या पुढे उतारा मिळणार नाही़, अशी परिस्थिती आहे़ कापूस उत्पादकांना उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्क्यांची झळ सोसावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ सोयाबीनची मोठी लागवड केली जात असलेल्या परळी, अंबाजोगाई, धारूर या तालुक्यातही पावसाने अखडता हात घेतल्याने सोयाबीनच्या एका झाडाला १० ते २० शेंगाच्या वर फळधारणा झालेली नाही़ त्यामुळे त्या भागातील सोयाबीन उत्पादक मोठ्या चिंतेत आहेत़ (वार्ताहर)