कुसळवाडीत विवाहितेला विषारी द्रव पाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:08 IST2019-05-10T00:07:44+5:302019-05-10T00:08:36+5:30
न्यायालयात दाखल केलेला खटला पत्नी मागे घेत नसल्याने पती, सवत, सासू आणि सासऱ्याने तिला बळजबरीने विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे सोमवारी दुपारी घडली.

कुसळवाडीत विवाहितेला विषारी द्रव पाजले
अंबाजोगाई : न्यायालयात दाखल केलेला खटला पत्नी मागे घेत नसल्याने पती, सवत, सासू आणि सासऱ्याने तिला बळजबरीने विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे सोमवारी दुपारी घडली.
शालुबाई पंडित राठोड (वय २५) असे त्या विवाहितेचे नाव आहे. तिचा सासरच्या व्यक्तीविरोधात न्यायालयात खटला सुरु आहे. हा खटला मागे घ्यावा यासाठी तिच्या सासरच्या लोकांनी तगादा लावला होता. परंतु शालूबाई ऐकत नसल्याने चिडलेला पती पंडित मोतीराम राठोड, सवत शशीबाई, सासरा मोतीराम खुबा राठोड आणि सासू केशरबाई यांनी कुसळवाडी तांडा क्र. १ येथे शालूबाईच्या माहेरी जाऊन लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर सवत, सासू-सासरे यांनी तिचे हातपाय दाबून धरले आणि पतीने तिला विषारी द्रव पाजले असे शालूबाईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून वरील चारही आरोपींवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे करत आहेत. दरम्यान, विषबाधा झालेल्या शालूबाईवर अंबाजोगाईच्या स्वाराती रु ग्णालयात उपचार सुरु आहेत.