'कुऱ्हाडीने वार करून पत्नीला संपवले'; पोलीस ठाण्यात आलेल्या पतीच्या कबुलीने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 20:08 IST2023-02-07T20:07:21+5:302023-02-07T20:08:14+5:30
मुले शाळेत, आई-वडील बाहेरगावी गेल्याने घरी कोणीच नव्हते

'कुऱ्हाडीने वार करून पत्नीला संपवले'; पोलीस ठाण्यात आलेल्या पतीच्या कबुलीने खळबळ
- मधुकर सिरसट
केज (बीड) : तालुक्यातील ढाकेफळ शिवारातील चौसा वस्तीवर पत्नीचा कुऱ्हाडीने गळा चिरून हत्या केल्यानंतर पती पोलीस ठाण्यात हजर झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. आरती भगवान थोरात ( 25 ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती भगवान शाहूराव थोरात यास पोलिसांनी अटक केली आहे .
भगवान शाहूराव थोरात हा आठवडी बाजारातून घरी आला. यावेळी पत्नी आरती सोबत त्याचा वाद झाला. संतापलेल्या भगवानने पत्नी आरतीला खालीपाडून कुऱ्हाडीने गळ्यावर वार केला. यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर भगवान थोरात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. येथे ठाणे अंमलदारांना त्याने हत्येची माहिती दिली.
त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपज़िल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. संतापाच्या भरात केलेल्या कृत्याने दोन मुले आईच्या मायेला पोरकी झाली आहेत.
मुले शाळेत, आई-वडील बाहेरगावी
आरती थोरात आणि भगवान थोरात यांना दोन लहान मुलं आहेत.ते प्राथमिक शाळेत होते. जालना जिल्ह्यातील नातेवाईकाच्या लग्नाला भगवान थोरातची आई गेली होती. तर दिंद्रुड येथील एका नातेवाईकच्या कार्यक्रमाला वडील आणि भाऊ गेले होते. त्यामुळे पती, पत्नीतील वादाला सोडवायला कोणीच नसल्याने हा अनर्थ घडला अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. सर्व नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गॅरेजवर गर्दी तरीही पती घरी
भगवान थोरात याचे अंबाजोगाई महामार्गांवर केज येथे ट्रॅक्टर दुरुस्तीचे गॅरेज आहे. आज बाजार दिवस असल्यामुळे गर्दी असतानाही तो दुपारीच गॅरेज बंद करून घरी गेला होता. त्यानंतर त्याने पत्नीचा खून केला. यावरून त्याने हा पुरवणीयोजित कट आखला होता का? या दिशेनेही पोलीस चौकशी करीत आहेत.