आगीने मारले, समाज सहभागाने तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:00+5:302021-04-02T04:35:00+5:30
धारूर : तालुक्यातील चौंडी गावचे ऊसतोड कामगार बंकटी कुंडलिक मुंडे यांचे कुटुंबीय नुकतेच गाळप हंगाम करून गावी परत ...

आगीने मारले, समाज सहभागाने तारले
धारूर
: तालुक्यातील चौंडी गावचे ऊसतोड कामगार बंकटी कुंडलिक मुंडे यांचे कुटुंबीय नुकतेच गाळप हंगाम करून गावी परत आले होते. २९ मार्च रोजी दुपारी सर्व जण शेतातील कामासाठी गेलेले असताना शेतातील घराला अचानक आग लागली आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण आयुष्याच्या संसाराची राख रांगोळी झाली असून, या कुटुंबाला सामाजिक जाणिवेतून पुढाकार घेऊन मदत केल्याने मोठा आधार मिळाला.
धारूर तालुक्यातील काही समाजसेवी पदाधिकाऱ्यांमुळे धारूर तालुक्यातील जनतेला आधार देण्याचे व मनोबल वाढवण्याचे काम होत आहे. अशा कामात अग्रेसर असतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. ईश्वर मुंडे, धारूर पंचायत समितीचे सभापती हनुमंत नागरगोजे व इतर पदाधिकारी.
आसोला येथील अपघातग्रस्त कुटुंबाला केलेल्या मदतीची घटना ताजीच असताना चौंडी येथील बंकटी मुंडे यांचे राहते घर जळून भस्मसात झाल्याची घटना गाव पुढाऱ्यांनी प्रा. ईश्वर मुंडे, हनुमंत नागरगोजे व लालासाहेब तिडके यांना सांगितली. आपण सदरील कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवावे व जीवनावश्यक बाबींची मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. ईश्वर मुंडे, हनुमंत नागरगोजे, लालासाहेब तिडके, काॅ. बालासाहेब चोले यांनी घरावरील पत्रे व दैनंदिन वापराचे कपडे सदरील कुटुंबाला चौंडी येथे जाऊन पोहोच केले.
आपल्यावर आलेले संकट व मदतीसाठी सरसावलेले हात पाहून कुटुंबातील व्यक्तींना गहिवरून आले. जळीतग्रस्ताच्या पत्नीने तर हंबरडाच फोडला.
चौंडी गावातील समाजप्रेमी व्यक्ती गोविंदराव मुंडे, राजाभाऊ मुंडे, अशोक मुंडे, सुरेश मुंडे, सर्जेराव मुंडे, दादासाहेब मुंडे, प्रभू मुंडे, आश्रुबा मुंडे, सुभाष मुंडे, धनराज मुंडे, व्यंकटी मुंडे, महादेव मुंडे, भीमराव मुंडे, ज्ञानेश्वर मुंडे यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली. काही जणांनी किराणा तर काही ग्रामस्थांनी धान्य स्वरूपात मदत केलेली असून, मदतीचा ओघ चालूच आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घराचा पंचनामा केलेला आहे. प्रचलित शासकीय नियमानुसार फक्त जीवितहानी झालेल्या कोंबड्या, शेळ्या, बैल, म्हैस यांचीच किंमत मिळते. इतर कोणत्याच बाबींची भरपाई मिळत नाही. यामुळे या कुटुंबालाही मोठी मदत मिळणार नाही. ही दुर्दैवी बाब असून, प्रचलित शासन नियमात बदल होणे आवश्यक असल्याचे मत प्रा. ईश्वर मुंडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
===Photopath===
010421\img-20210331-wa0179_14.jpg